नैसर्गिक शेतीतून विषमुक्त अन्नधान्य निर्मिती शक्य: रितोंड

पंढरपूर: सध्या मोठया प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जात असल्याने माणसाचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर उपाय म्हणून विषमुक्त अन्नधान्य गरजेचे असून नैसर्गिक शेतीतून विषमुक्त अन्नधान्य निर्मिती शक्य आहे असे प्रतिपादन नैसर्गिक शेतीचे प्रबोधक गहिनीनाथ रितोंड यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे आयोजित केलेल्या सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती शिवार फेरीप्रसंगी रितोंड बोलत होते. या कार्यक्रमासाठी शरद शिंदे, समाधान पाटील, सिध्देश्वर भोसले, बिराजदार, यांच्यासह नैसर्गिक शेतीचे केवड द्राक्ष ग्रुप, बेंबळे ग्रुप, अनगर ग्रुप व जिल्ह्यातील नैसर्गिक शेतीचे शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकरी जोतिराम कदम यांनी शेतकर्‍यांना विविध देशी बीयांचे वाटप केले.
श्री सद्गुरू नैसर्गिक शेती फर्म व हॉटेल सद्गुरू प्रसाद नैसर्गिक हॉटेल येथे पार पडलेल्या या शिवार फेरीप्रसंगी नैसर्गिक शेती पध्दती, गोबर गॅस, गांडूळ खत प्रकल्प आदींची पाहणी करून माहिती घेतली. पुढे मार्गदर्शन करताना रितोंड यांनी नैसर्गिक शेतीचे फायदे, आरोग्यदायी उत्पादन व आपल्याच नैसर्गिक शेतीमालास कशाप्रकारे बाजारपेठ मिळवावी याची माहिती दिली.