उरमोडीतून विसर्ग वाढवला; पावसाचा संततधार कायम, जनजीवन विस्कळीत, नवीन उरमोडी पूल पाण्याखाली

 

वार्ताहर
परळी
गेल्या 2 ते 3 दिवसांपासून परळी खोऱ्यात पावसाची कोसळधार सुरू आहे. पावसाने थोडीही उसंत न घेतल्याने परळी खोऱ्यातील दुर्गम भागातील गावांचा संपर्कही तुटला आहे. तर रस्त्यावर मातीचा भराव येणे अन वाहतूक बंद होण्यासारखे प्रकार होऊ लागले आहेत.
भागातील पावसाची संततधार हे गेल्या दोन-तीन दिवसांपासून थांबलीच नाही त्यामुळे ठोसेघर सांडवली केळवली धबधब्यासह फेसाळले आहेत. यामुळे पाण्याची आवक ही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने उरमोडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. शनिवार 15 ऑगस्ट सायंकाळी सहा वाजता सांडव्यातून 6670 क्यूसेक तर विद्युत गृहातून 400 असा एकूण 7070 क्यूसेक विसर्ग उरमोडी नदी पात्रात सुरू आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने नवीन तयार करण्यात आलेला उरमोडी पूल पाण्याखाली गेला आहे. उरमोडीचे वक्र दरवाजा 1 व 4 हे 0.75 मी तर वक्र दरवाजा 2 व 3 हे 0.50 मी उचलले आहेत. पर्जन्यमान व पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यास विसर्ग वाढविण्यात येईल तसेच कोणत्याही कारणास्तव उरमोडी नदी पात्रात प्रवेश करू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत.