राष्ट्रीय कर्तव्यासाठी आईसोबत भर पावसात तीन वर्षाचा चिमुकला ; पाटण येथे निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज

 

पाटण :- भर पाऊसात निवडणुकीच्या राष्ट्रीय कर्तव्यासाठी निघालेल्या आईच्या पाठोपाठ तीन वर्षाचा चिमुकला मात्र अंगावर पावसाच्या सरी घेऊन खैराभावरा होऊन जात होता. कशासाठी व कोणासाठी आईसोबत धो-धो पाऊसाच्या सरी झेलत जात आहोत याची जाणीव ही त्याला नसावी.

गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेल्या पाऊसात शनिवारी सायंकाळी निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा मात्र भर पाऊसात सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी सकाळ पासून पाटण परिसरात पाऊसाचा जोर वाढला असताना अशा पाऊसात मतदानासाठी झालेल्या तयारीत शासकीय यंत्रणेची मात्र तारांबळा उडाली. येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या मैदानावर २६१ पाटण विधानसभा व ४५ सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शासकीय यंत्रणेची जय्यत तयारी सुरु असताना यासाठी उभा केलेला मंडप पाऊसाने अनेक ठिकाणी पडला तर मैदानावर सगळीकडे चिखल झाला. वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. अशा परस्थितीत व भर पाऊसात निवडणूक कर्मचारी, अधिकारी आपले कर्तव्य बजावताना दिसत होते.