खा. शरद पवारांविरोधात बोलाल तर जीभ हासडून हातात देऊ ; आ. गोपीचंद पडळकर यांना सत्यजितसिंह पाटणकर यांचा इशारा.

पाटण :- भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमचे नेते शरद पवार साहेब यांच्यावर टिका करताना अगोदर स्वत:ची उंची तपासून पहावी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही अनेक मुद्द्यांवर पवार साहेबांचा सल्ला घेतात. त्यामुळे सतरा पक्ष बदलून कालपरवा भाजपामध्ये गेलेल्या पडळकरांनी जीभ संभाळून वक्तव्य करावे अन्यथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुम्हांला महाराष्ट्रात फिरु देणार नाहीत असा खणखणीत इशारा सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिला.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा पाटण राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ‘जोडे मारो’ आंदोलन करुन गुरुवारी (ता.२५) जाहीर निषेध करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

पाटण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालय परिसरात केलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले. यावेळी पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी  करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी सोबत आणलेल्या बॅनरवरील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारुन निषेध नोंदवला. यावेळी पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, पाटण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ काळे, पाटण नगर पंचायतीचे अध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष सचीन कुंभार, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अविनाश जानुगडे, माजी प.स. सदस्य सौ. शोभा कदम, मिलन सय्यद राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाटणकर पुढे म्हणाले. गोपीचंद पडळकर तुम्हांला मिळालेली आमदारकी ही पवार घराण्याचा मेहरबानीनेच मिळाली आहे. ना. अजितदादा पवार यांच्या विरोधात तुम्ही बारामतीत जावून निवडणूक लढवली म्हणुनच भाजपने तुम्हाला आमदारकी दिली. त्यामुळे यातही पवार घराण्याचेच योगदान आहे याची जाणीव ठेवा. तुमची लायकी काय हे बारामतीकरांनी तुमचे डिपॉझिट जप्त करून दाखवून दिले आहेच तरीदेखील तुम्हाला अद्दल घडली नाही. आमचे नेते खा. शरद पवार हे आमच्याच नव्हे तर उभ्या देशाचे दैवत आहे त्यांचे माप काढायचे सोडा पण त्यांचे नाव घेण्याचीही तुमची लायकी नाही. त्यामुळे तोंडावर ताबा ठेवा अन्यथा तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही. वारंवार पक्ष बदलणाऱ्या तुमच्या पक्षनिष्ठा तपासणीसाठी तुमची नार्को टेस्ट केली तर त्यातून नक्की कोणता पक्ष बाहेर येईल याची तुम्हालाच खात्री नाही त्यामुळे संवंग लोकप्रियतेसाठी बेताल वक्तव्य करू नका. खा. शरद पवारांविरोधात बोलल्यानंतर तुमचा पक्षही तुमच्या सोबत नाही यावरूनच तुमची नक्की लायकी काय हे उभ्या देशाने पाहीले आहे. तुमचे तोंड काळे करून आमचे हात घाण करण्यापेक्षा तुम्ही पवारांहेबांविरूद्ध गरळ ओकून स्वतःहूनच स्वतःचे तोंड काळे केले आहे. आता बास यापुढे जर पवारसाहेबांविरूद्ध काय बोलालं तर तुमची जीभ हासडून हातात दिल्याशिवाय राष्ट्रवादीचा कार्यकर्ताच नव्हे तर जनताही शांत बसणार नाही असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिला.