Friday, April 19, 2024
Homeताज्या घडामोडीकोयना धरण परिसरात धो.. धो.. पाऊस

कोयना धरण परिसरात धो.. धो.. पाऊस

* कोयना धरण परिसरात धो.. धो.. पाऊस
* धरणाचे सहा वक्र दरवाजे दहा फुटांवर..
* नदीपात्रात ५४ हजार २४६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग..
* धरण व्यवस्थापनाचा नियोजन शून्य कारभार.. कोयनेला पुन्हा पूर..
* कोयना – कृष्णा काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा..
* कोरोनाच्या संकटात पूराचे संकट..

           पाटण:- कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणखी वाढत आसताना धो.. धो.. पावसाला सुरुवात झाली आहे. परिणामी धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत असताना ९१.३१ टि.एम.सी. पाणी साठा झाला आहे. पाणी साठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे दुपारी चार फुटांवरून दहा फुटांवर उचलण्यात आले आहेत. यामुळे कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद ५४ हजार २४६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक प्रतिसेकंद ८४ हजार ६५ इतकी आहे.  या विसर्गामुळे नदीपात्राच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत असून कोयना – कृष्णा नदीकाठावरील गावांना धरण व्यवस्थापनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर गतवर्षी २०१९ ची कोयना पूरपरिस्थिची भिती नागरिकांच्या मनात घर करून बसली असताना चालू वर्षी धरण व्यवस्थापणाकडून पाण्याचे योग्य नियोजन होणे अपेक्षित होते. केवळ नियोजन शून्य कारभारामुळे पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागणार अशा संतप्त प्रतिक्रिया कोयना धरण व्यवस्थापनाच्या कारभारावर होत आहेत.

            शनिवार दि. १५ औगस्ट स्वातंत्रदिनाच्या दिवशी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पावणे दोन फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद १० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करणेत आला आहे. तदनंतर धरण परिसरातील पावसाचा जोर वाढत आसताना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता  पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी सकाळी १० वा. धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटांवर उचलण्यात आले. तर दुपारी चार वाजता हे दरवाजे चार फुटांवरून दहा फुटांवर उचलण्यात आले आहेत. यामुळे नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग ५४ हजार २४६ क्युसेक्स इतका झाला आहे. या विसर्गाने नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून कोयना – कृष्णा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चौकट- १
कोरोनाच्या संकटात पूराची भिती ..
गेल्यावर्षी २०१९ ला जुलै औगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे कोयना नदीला महापूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे विक्रमी २२ फुटांवर उचलून नदीपात्रात सरासरी एक लाख  चाळीस हजार क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होते. या पूर परिस्थिती मुळे कोयना काठ अक्षरशः पाण्यात बुडाला होता. पाटण सह अनेक गावांत पाणी शिरले होते. मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली‌. नागरिकांचे हाल हाल झाले. या बरोबरच कृष्णा काठावरील सातारा जिल्ह्यातील कराड तालुका, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पूराचा मोठा फटाका बसला होता. हि भिती नागरिकांच्या मनात अजूनही कायम असताना आता पुन्हा एकदा चालू वर्षी देखील कोयना नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे कोरोनाच्या संकटात पूराची भिती निर्माण झाली आहे.

चौकट- २
कोयना धरणात सध्या ९१.३१ टि.एम.सी. पाणी साठा झाला आहे. धरणाची पाणी पातळी २१५२.८ इंच तर ६५६.१३३ मीटर झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ८४ हजार ०६५ इतकी असुन धरणाचे सहा वक्र दरवाजे १० फुटांवर उचलून नदीपात्रात प्रतिसेकंद ५४ हजार २४६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या बारा तासात कोयना- ४२ मि.मी. (३३६३), नवजा- ८१ मि.मी.(३८४३), महाबळेश्वर- ६४ मि.मी. (३७७०) पावसाची नोंद झाली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular