Thursday, April 18, 2024
Homeठळक घडामोडीवाट्टेल त्या परस्थितीत वर्गमित्र बच्चूदादांनाच साथ देणार : खा.छ. उदयनराजे भोसले

वाट्टेल त्या परस्थितीत वर्गमित्र बच्चूदादांनाच साथ देणार : खा.छ. उदयनराजे भोसले

पाटण, दि. १४ : राष्ट्रवादीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांनी गुरूवारी सायंकाळी प्रथमच पाटणमध्ये येऊन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दीड तास झालेल्या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे समजते. भेटीनंतर खा. उदयनराजे भोसले यांनी यापूर्वी गैरसमज झाले असतील तर ते दूर सारून वाट्टेल त्या परिस्थितीत आजपासून भविष्यकाळात बच्चुदादांना मी साथ देणार असल्याची खात्री श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

हि भेट सदिच्छा होती की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर बोलताना खा. छ. उदयनराजे भोसले म्हणाले. पहिल्यापासून नातेगोत्याचे संबंध आहेत. कॉलेजपासून मित्राचे संबंध आणि आज आलो ते आदरणीय सरकारांचा आशिर्वाद घेण्यासाठी आणि मित्र बच्चुदादांना भेटण्यासाठी. योगायोग कसा असतो ते पहा आजच राष्ट्रवादीकडून यादी जाहीर झाली आणि मी पाटणमध्ये आलो. कालच पाटणमध्ये यायचे ठरले होते. यापूर्वी समज-गैरसमज जे झाले ते दूर झाले पाहिजेत. मागे काय झाले ते विसरून कार्यकर्ते तुमचे व आमचे देखील आहेत त्यांना सामोरे जाताना त्यांची समजूत घालावी लागते. अगदीच काही टोकाचे झाले अशातला काही भाग नाही. गैरसमजातून काही गोष्टी घडल्या ते नाकारता येत नाही. आजपासून भविष्यकाळात कायमस्वरूपी वाट्टेल त्या परिस्थितीत बच्चुदादांची मी साथ देणार असल्याची खात्रीच त्यांनी यावेळी बोलताना दिली.

खा उदयनराजे भोसले हे गुरुवार दि १४ रोजी पाटणमध्ये दाखल झाल्यानंतर झेंडा चौकात कार्यकर्त्यांनी महाराजांचे फटाक्यांच्या आतषबाजीने जंगी स्वागत केले. त्याठिकाणी कार्यकर्त्यांची चर्चा केल्यानंतर महाराज थेट विक्रमसिंह पाटणकर यांच्या निवासस्थानी गेले. तेथे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, उपसभापती राजाभाऊ शेलार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे यांनी श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांचे हार घालून स्वागत केले. यावेळी खा. भोसले यांच्यासोबत डॉ. चंद्रशेखर घोरपडे, सुनील काटकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

सरकार आणि महाराजांची यशस्वी भेट

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासोबत खा. श्रीमंत. छ. उदयनराजे भोसले यांनी सुमारे दीड तास कमराबंद चर्चा केली. चर्चेनंतर बाहेर येताना सर्वांच्याच चेहऱ्यावर हास्य उमटलेले दिसत होते. त्यामुळे या चर्चेत लोकसभा व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि महाराज यांची ग्रेट भेट यशस्वी झाल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular