आगामी निवडणुकीत भाजपाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही : खा. शरद पवार

फलटण : देशातील जनतेला आश्वासनांचे व विकासांचे गाजर दाखविण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही, शेतकरी, कामगार, बेरोजगारी, सैन्याची सुरक्षितता आदी प्रश्नासाठी व सामान्य जनतेस चांगले दिवस येण्यासाठी विरोधकांची एकजूट आणि जनतेची साथ आगामी निवडणुकीत भाजपाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.
फलटण येथील सजाई कार्यालयात माढा लोकसभा अंतर्गत फलटण कोरेगांव आणि माण खटाव विधानसभा मतदार संघातील राष्टवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्ते, आजी, माजी जि प प स सदस्य, बूथ अध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी यांच्यासाठी कार्यकर्ता संवादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, जि प अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, माजी खा. रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी आ. प्रभाकर घार्गे, राष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने, फलटण कृषि उत्तपन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा निता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोइटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, प. स. सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर, सुभाषराव शिंदे, डॉ विजयराव बोरावके, डि. के. पवार, प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.
देशात आज सर्वत्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे याचा फायदा शेजारील शत्रु राष्ट्र घेऊन वारंवार देशात हिंसाचार पसरवत आहेत पुलवामा घटनेसंदर्भात सर्व विरोधक एकत्र होऊन सरकारला पाठिंबा देत असताना त्याच्या दुसर्‍या दिवशी देशाचे पंतप्रधान राजकीय कार्य करत आहेत त्यांना जनतेच्या भावनेशी काही देणेघेणे नाही असा आरोप खासदार शरद पवार यांनी केला .
भाजपा सरकारने देशातील रिझर्व बँक, न्यायपालिका सीबआय यामध्ये हस्तक्षेप केल्याने त्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत काळा पैसा आणण्याच्या नावाखाली त्यांनी नुसती दिशाभूल केली आहे नोट बंदी जीएसटी याचा काहीच फायदा जनतेला झालेला नाही महागाई प्रचंड वाढली आहे शेतकरी आत्महत्या करताहेत शेतकर्‍यांना त्यांनी जाहीर केलेली मदत आणि पॅकेज हे नंतर फसवे निघाल असल्याचेे अनेक उदाहरणाद्वारे शरद पवारांनी स्पष्ट केले
देशातील सर्व विरोधकांनी एकत्र येत भाजपा सरकार विरोधात एकीची मूठ बांधलेली आहे ही एकजूट सत्ता परिवर्तन करण्यास पुरेशी आहे माझ्या घरीच सर्वांच्या बैठका होत असून आता महाराष्ट्रातून ताकद मिळणे गरजेचे आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एक संघटित होऊन एक विचाराने सत्ता परिवर्तन घडविण्यासाठी सज्ज व्हावे राज्यातही भाजपा सरकारने नुसती फसवाफसवी केलेली आहे धनगर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या नावाखाली निवड धूळफेक सुरू आहे मागील निवडणुकीच्या वेळेस सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी बारामतीत येऊन भाजपा सत्तेत आल्यास पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला होता मात्र आता त्यांची जाण्याची वेळ आली तरी त्यांनी काहीच आरक्षणासाठी केलेले नाही याउलट धनगर समाजाचा आरक्षणचा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी वारंवार लोकसभेत उचलून धरला असल्याचे शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिले
यापूर्वी खासदार शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नाही असे जाहीर केले होते मात्र सध्या त्यांची देशाला गरज असून देशात सर्व विरोधकांची एकजूट त्यांनी घडवून आणलेली आहे आज ते पंतप्रधानपदाचे सक्षम उमेदवार असून अशा परिस्थितीत त्यांनी लोकसभेवर निवडून जाणे गरजेचे होते यासाठीच आम्हा सर्व नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे 2009 साली त्यांना जे मताधिक्य भेटले त्यापेक्षा जास्त मताधिक्य यावेळी आम्ही देऊ अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचीे ताकद प्रचंड आहे शरद पवार यांचे दिल्ली दरबारी मोठे राजकीय वजन असून त्यांच्या नावाचा प्रचंड दबदबा आहे त्यांनी यापूर्वी कृषीमंत्री म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे आज शेतकरी अडचणीत असताना त्यांची प्रचंड गरज देशाला आहे त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त मतांची ताकद देऊन लोकसभेत पाठवण्याची गरज रामराजेनी व्यक्त केली
यावेळी माजी खा रणजीतसिंह मोहिते पाटिल, माजी आ प्रभाकर घार्गे,कविता म्हेत्रे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले तर आभार आ दीपक चव्हाण यांनी मानले.