फलटण नगरपरिषदेच्या अभिलेख कक्षातील कागदपत्रांची चोरी

फलटण: फलटण नगरपरिषदेच्या अभिलेख कक्षातील कागदपत्रांची रात्रीच्या वेळी पालिकेत येवून चोरी करणार्‍या दोघा कर्मचार्‍यांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
फलटण पालिकेतील कर निरीक्षक रोहित रायण जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ते पालिकेतील अभिलेख कक्षाकडील जन्म मृत्यु निबंधकाचे सहाय्यक म्हणून कामकाज पाहत असतात. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर ते या अभिलेख कक्षाचे दार बंद करुन जात असतात. दि. 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5. 45 वाजता त्यांनी अभिलेख कक्षाला लॉक करुन सिल करुन ते निघून गेले. त्यानंतर दि.15 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता नेहमी प्रमाणे ते कामावर आले असता अभिलेख कक्षाच्या लॉकचे कागदी सिल त्यांना उचकटून पुन्हा चिटकवले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हि बाब सहाय्यक कार्यालय निरीक्षक मुस्ताक अहम्मद महात यांच्या निदर्शनास आणून दिली यानंतर घडलेला प्रकार मुख्याधिकार्‍यांना दूरध्वनीवरुन सांगितला. त्यानंतर संगणक अभियंता सुप्रिया पवार यांच्या मार्फत पालिकेतील सी. सी. टी. व्ही. फुटेज पाहिले असता फुटेजमध्ये सायंकाळी 8 : 10 ते 8 : 15 वाजणेचे सुमारास नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपीक विलास पांडुरंग जाधव (रा. गणेशशेरी, धुळदेव, ता.फलटण) सफाई कामगार अमोल मोहन गायकवाड (रा. सफाई कॉलनी, फलटण) हे अभिलेख कक्षाजवळ आल्याचे व विलास जाधव यांनी अभिलेख कक्ष उघडलेचे व त्यानंतर कागदपत्रे किंवा रजिस्टर इनशर्टमध्ये लपवून घेवून गेलेचे त्यांना दिसले. याबाबत वॉचमन पोपट भंडलकर यांना विचारणा केली असता व्हिजीटर्स रजिस्टरमध्ये त्या दोघांची नावे लिहिलेली असून त्यांनी सह्या करा असे म्हणल्यावर आमचे ऑफीसमध्ये फक्त पाच मिनिटाचे काम आहे अर्जाचा फॉरमॅट नेण्यास आलो आहे असे सांगितले. त्यामुळे ते अभिलेख विभागात चोरी करण्याच्या उद्देशाने कार्यालयीन वेळेनंतर गेलेचे दिसून येत असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे .