फलटण येेथे सरासरी 5500 रूपये प्रतिक्विंटल दराने कांदा विक्री

फलटण: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवार दि.3 डिसेंबरच्या कांदा बाजारात गरवा/हळवा 1125 पिशवी, 562 क्विंटल कांद्याची आवक झाली असून गरवा कांदा किमान 3 हजार व कमाल 13501 रुपये सरासरी 8 हजार रुपये दराने तर हळवा कांदा किमान 2 हजार रुपये व कमाल 9500 रुपये सरासरी 5500 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेल्याची माहिती बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
गरवा कांदा 120 क्विंटल आवक झाली असून गरवा नं. 1 कांदा प्रतिक्विंटल 10000 ते 13501 रुपये, नं. 2, 6000 ते 10000 रुपये आणि नं. 3, 3000 ते 6000 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. हळवा कांद्याची 442 क्विंटल आवक झाली असून हळवा नं. 1, 7000 ते 9500 रुपये, नं. 2, 4500 ते 7000 आणि नं. 3, 2000 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. गरवा कांद्याचा सर्वाधिक दर राजेश रतनलाल शहा यांचे अ‍ॅग्रो ट्रेडर्स आणि हळवा कांद्याचा सर्वाधिक दर मेसर्स भोसले ट्रेडींग कंपनी आणि धनेश ट्रेडर्स यांच्या अडतीवर निघाला. कांदा लिलावामध्ये सहभागी सर्व आडते व खरेदीदार यांचे बाजार समितीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
फलटण बाजार समितीच्या मार्केट यार्डवर विक्रीसाठी येणार्‍या कांद्याला नेहमीच जिल्ह्यासह इतर राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर मागणी असून परपेठेतील खरेदीदार येथे येत असल्याने काद्यांची विक्री चढ्यादराने होत असल्याचे बाजार समितीचे व्हा. चेअरमन भगवानराव होळकर यांनी सांगितले. फलटण बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणलेल्या सर्वच शेतमालाचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर लगेच केले जात असून 24 तासाच्या आत रोख पेमेंटची व्यवस्था ही या बाजार समितीची वैशिष्ठ्ये आहेत. शेतकर्‍यांच्या अडीअडचणी समजावून घेवून त्याची सोडवणूक करण्यासाठी बाजार समिती नेहमीच प्रयत्नशील असते. सध्या कांद्याला असलेल्या चांगल्या दराचा विचार करुन कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी आपला कांदा स्वच्छ व प्रतवारी करुन (निवडून) विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी केले आहे.
फलटण तालुक्यात सुमारे 2200 हेक्टर क्षेत्रावर खरीप कांद्याची लागण झाली होती त्यापैकी 1800 हेक्टर कांदा पीकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले असून केवळ 400 हेक्टर क्षेत्रावरील हळवा (रांगडा कांदा) सध्या बाजारात विक्रीस येत असून त्यालाही प्रतवारीनुसार दर मिळताना बहुतांश कांदा तिसर्‍या नंबरवर विक्रीसाठी जात असल्याने चढ्या दराचा लाभ फार कमी शेतकर्‍यांना मिळतो आहे त्याला पूर्णत: निसर्ग म्हणजेच प्रामुख्याने अतिवृष्टीचा फटका कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले असून आगामी काळात दर टिकले तर उर्वरित कांद्याला चांगला दर मिळून शेतकर्‍याला त्याचा लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.