पंचायत समितीचे सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित

फलटण: जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली. त्यामध्ये फलटण पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेले आहे. फलटण पंचायत समितीच्या सभापती पदी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर की युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या पैकी कुणाची वर्णी लागते ह्याकडे आता तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
फलटण पंचायत समितीत 14 जागांपैकी 12 जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाकडे आहेत त्यामुळे रामराजे व संजीवराजे सांगतील तोच सभापती होणार ह्यात तिळमात्र शंका नाही.
गत काही महिन्यापासून फलटण पंचायत समितीच्या सभापती पद हे अनुसूचित जाती ह्या प्रवर्गासाठी राखीव होईल असा कयास बांधला जात होता परंतु काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आरक्षण सोडतीत फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण खुल्या गटासाठी पडल्यामुळे सर्वच चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
आता पंचायत समितीच्या सभापती पदी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर की श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांची वर्णी लागणार ह्या कडे आता लक्ष लागून राहिले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यात आपला झंझावात दाखवत तालुक्यातील युवा वर्गाला राजे गटाकडे वळवण्याचे यशस्वी काम केलेले आहे. परंतु पंचायत समिती मध्ये अनुभवाचा विचार केला तर श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर निंबाळकर यांचेच पारडे जड राहणार आहे.
श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर निंबाळकर हे नुकतेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी निवड झालेली आहे.
श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर निंबाळकर यांना पंचायत समितीच्या कामकाजाचा अनुभव व प्रशासन हाताळण्याची कलाही अवगत आहे त्या मूळे श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्याच गळ्यात सभापती पदाची माळ पडेल अशी चर्चा वर्तवली जात आहे.
उपसभापतीपदी कोण ?
फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विद्यमान उपसभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर हे जर सभापती पदी विराजमान झाले तर उपसभापतीपदी तालुक्यातील कोणत्या भागाला दिले जाणार व कोणत्या पंचायत समिती सदस्याची वर्णी लागणार ह्याकडे आता तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. ज्या पंचायत समिती गणाला ह्यापूर्वी सभापती व उपसभापती पदाची संधी मिळाली नाही त्या गणाला संधी देणार का ? असा प्रश्‍नही उपस्थित राहत आहे.