तिरकवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा हिरक महोत्सव उत्साहात

फलटण: तिरकवाडी (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेच्या हिरकमहोत्सव समारंभात तिरकवाडी सोशल ग्रुपने शाळेतील मुलांना बुट देऊन व गुरुजनांचा योग्य सन्मान करुन एक नवा आदर्श निर्माण केल्याचे प्रतिपादन फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे यांनी केले.
तिरकवाडी (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेला 60 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल तिरकवाडी सोशल ग्रुप व ग्रामस्थांच्यावतीने आयोजित हिरक महोत्सव समारंभात प्रा.शाळा व अंगणवाडीतील मुलांना सोशल ग्रुपचेवतीने शालेय बुटांचे वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी फलटण पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे होते. जयभवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंदराव शितोळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी पंढरीनाथ शिंदे, धोंडीराम सोनवलकर, राजाराम गुंजवटे, ताजुद्दीन मुलाणी, नजीर शेख, गोरख माने या गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी गंबरे पुढे म्हणाले, गावातील नोकरदार युवकांनी गावातील सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी सोशल ग्रुपची निर्मिती करुन गावामध्ये वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबवत आहेत हा आदर्श इतरांनी घेण्यासारखा असून जिल्हा परिषद शाळा या स्पर्धाच्या युगातही टिकली पाहिजे यासाठी शासनाच्या जोडीला नागरिकांची साथ असणे महत्वाचे आहे.
यावेळी सरपंच जनाबाई खवळे, उपसरपंच रखमाबाई सोनवलकर, उस्मानाबादचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगूभाई शेख, सांगोल्याचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, प्राचार्य अशोक गुंजवटे, सोमनाथ घोरपडे, शंकरराव इंगळे, आर. आर. रणवरे, सुभाष सोनवलकर, विकास सोनवलकर, मेहुल शहा, चंद्रकांत पवार, अरविद सोनवलकर, संभाजी शिंदे, नारायण नाळे, शाळा समितीचे अध्यक्ष गजानन बोराटे, विजय बिचुकले, किसन कचरे, सचिन सोनवलकर, सचिन नामदास, अतुल पवार, ज्ञानेश्वर सोनवलकर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी तिरकवाडी सोशल ग्रुपच्यावतीने जिल्हा परिषद प्रा. शाळेचे विद्यार्थी व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना बुटाचे वाटप करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते केंद्रस्तरीय स्पर्धांमधील विशेष प्रावीण्य मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन शिंदे प्रास्ताविक नानासो काळुखे, समारोप व आभार शितल लंगडे यांनी मानले.