छत्रपतींच्या वंशजांचा सन्मान कमी होऊ देणार नाही: मुख्यमंत्री

सातारा: छत्रपती शिवरायांच्या नावाखाली महाराष्ट्रात राजकारण करणार्‍या राष्ट्रवादीने छत्रपतींच्या वंशजांना काय दिले? छत्रपतींचे घराणे घेणारे नाही देणारे आहे. भारतीय जनता पार्टीत उदयनराजे भोसले व शिवेंद्र राजे भोसले यांचा सन्मान कमी होऊ देणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा सैनिक स्कूलच्या प्रांगणात महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महा जनादेश यात्रेचे सातारा येथे आज दुपारी आगमन झाल्यानंतर आयोजित सभेच्या ठिकाणी उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपाच्या व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतांना सर्वप्रथम शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना तलवार भेट दिली तर उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना पारंपारिक राजेशाही पगडी घालून त्यांचे स्वागत केले. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेही स्वागत करण्यात आले.
दरम्यान, सातारा शहराच्या हद्दवाढीसह मेडिकल कॉलेजचे याच वर्षी प्रवेश, सातार्‍यातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी पन्नास कोटी व उरमोडीच्या उर्वरीत कालव्यांचे भूमीपूजन अशा घोषणांचा मुख्यमंत्र्यांनी पाऊस पाडला. संपूर्ण सातारा शहरातून आलेल्या जनादेश रॅलीला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सातारा सैनिक स्कूलच्या प्रांगणावर सायंकाळी सव्वासहा वाजता आगमन झाले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उदयनराजे भोसले, शिवेंद्र राजे भोसले खासदार संजय काकडे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर जयकुमार गोरे, सहकार परिषद अध्यक्ष शेखर चरेगावकर, कांताताई नलावडे, आमदार बाळासाहेब भेगडे, नगराध्यक्ष माधवी कदम, डॉ दिलीप येळगावकर, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले छत्रपतींचे वंशज आज आमच्यासमवेत आमच्या पक्षात एकाच मंचावर आहे यापेक्षा वेगळा सुदीन कोणता. महाजनादेश यात्रेचे सातार्‍यात भरभरून स्वागत झाले त्यासाठी मी सातारकरांचे मनापासून आभार मानतो. उदयनराजे यांनी मला पगडी दिली शिवेंद्र राजे यांनी तलवार दिली त्यामुळे मी आता छत्रपतींचा मावळा आहे. छत्रपतींनी मागण्या नाही तर आदेश करायचा असतो . फाईल पूर्ण असेल तर सातारा शहर हद्दवाढीच्या प्रस्तावावर मी उद्याच सही करतो. गिरिश महाजन यांची तयारी असेल याच वर्षी मेडिकल कॉलेजच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. सातारा शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी पन्नास कोटी रुपये व उरमोडी धरणाच्या कालव्यांच्या कामांच्या भूमीपूजनाची घोषणा मुख्यम त्र्यांनी केली . दोन्ही राजांनी भाजपामध्ये विना अट प्रवेश केला. त्यांच्या अटी या जनतेच्या विकास कामासाठी होत्या . अटींचे प्रश्नचिन्ह निर्माण करणार्‍या राष्ट्रवादीने दोन्ही राजांना काय दिले? जनतेच्या विकास कामांसाठी त्यांची धडपड आहे . छत्रपतीचे वंशज पक्षात आल्याने पक्षाची बळकटी वाढली आहे. महाजनादेश यात्रेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता महाराष्ट्राचा निकाल काय असणार आहे हे वेगळे सांगायला नको. गेल्या पाच वर्षाच्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत आम्ही जनतेशी संवाद साधतोय. विरोधी पक्षाकडे तेल लावलेला पैलवानच उरलेला नाही . पुन्हा समृद्ध महाराष्ट्रासाठी राज्यात भाजपची सत्ता आणायची आहे. सातारा जिल्हा पूर्णपणे बेघरमुक्त करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली. छत्रपतींच्या वंशजांच्या कार्यक्षमतेकडे दुर्लक्ष करणार्‍या राष्ट्रवादीला आता महाराष्ट्राची जनता त्यांना जागा दाखवून देणार आहे अशी टीका फडणवीस यांनी करत उदयनराजे व शिवेंद्र राजे यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये विक्रमी मताने निवडून आणण्याचे आवाहन केले. यावेळी उदयनराजेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात आमच्या मागण्यांकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले
असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी काँग्रेस -राष्ट्रवादीला पक्षाची आज झालेल्या अवस्थेबद्दल आत्मचिंतन करण्याचा सल्लाही दिला. यावेळी भाजपा प्रवेशानंतर प्रथमच जाहीर सभेत बोलताना उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. लोकसभा निवडणुका पार पडून केवळ तीन महिनेच झालेले असताना खासदारकीचा राजीनामा का दिला? याबाबत बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकार काळात जनतेची घेऊन गेलेली कामं कधीच झाली नाहीत. माझ्याकडून नेण्यात आलेल्या कामांच्या प्रस्तावांना कायम केराची टोपली दाखवली गेली, तरीपण मी 15 वर्षे सोबत होतो, खरतर याबाबत राष्ट्रवादीने मला सहनशीलतेचा पुरस्कार द्यायला हवा होता. शिवाय निवडणुकीत माझ्या मताधिक्क्यात झालेल्या घसरणीमुळे मी तो नैतिकदृष्या माझा पराभव मानतो असेही ते म्हणाले. तसेच काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात सरकारकडे कामं घेऊन गेलो तर पदरी कायम निराशाच पडली. जी कामं झाली ते मी स्वतः रेटून केली असे सांगत, सत्तेत असताना एक रुपयाचेही काम झालं नसल्याचा त्यांनी आरोप केला. यावेळी उदयनराजेंनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामकाजावर टीका केली. ते म्हणाले की, त्या काळात सरकारची इच्छाशक्ती व नियोजन नसल्यामुळे कामं झाली नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यासाठी हजारो कोटींची कामं मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले. लोकांची कामं करायची असेल तर माझ्याकडे दोनच पर्याय होते. एकतर राजीनामा देणे नाहीतर विकास करणार्‍यांबरोबर जाणे, म्हणुनच मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
ईव्हएमच्या मुद्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले की, जनता शेवटी कामांकडे पाहून मतदान करते. हे सरकार कामं मार्गी लावणारं सरकार आहे, म्हणूनच जनतेने या सरकावर विश्वास ठेवला. त्यामुळे ईव्हीएमच्या मुद्यावरून माझ्या मनात असलेल्या प्रश्नांच मला उत्तर मिळालं असल्याचेही उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केले.