कर्तव्य भावनेतून अजिंक्य जेष्ठ नागरिक संघाकडून पूरग्रस्तांना मदत

सातारा: कर्तव्य भावनेतून नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असणार्‍या अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघ, विलासपूर (गोडोली) सातारा यांच्यातर्फे नुकतीच पूरग्रस्तांना मदत देण्यात आली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस संघाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे पूरग्रस्तांसाठी 25 हजार रुपयांचा निधी देण्यात आला.
ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि कृष्णा, कोयना, पंचगंगा नद्यांना आलेल्या पुराचा फटका सातारा, सांगली, कोल्हापूर शहरांना व नदी काठावरील गावांना बसला. या नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचे संसार उध्वस्त झाले. वित्तहानी, मनुष्यहानी व पाळीव प्राण्यांची हानी झाली. या पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सहवास सभेत अध्यक्षांच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनास भरघोस प्रतिसाद मिळाला.
अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघ कार्यकारणी संस्था व सदस्यांकडून जमलेला एकूण 25 हजार रुपयांचा निधी नुकताच मुख्यमंत्री सहायता निधी जिल्हाधिकार्‍यांमार्फत देण्यात आला.
त्यावेळी अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रघुनाथ मोटे, उपाध्यक्ष प्रल्हाद साठे, सचिव पांडुरंग बिचकर, सहसचिव कृष्णराव जाधव, शशिकांत पारेख, खजिनदार विठ्ठल जाधव, सहखजिनदार रामचंद्र पंडित, संचालक कृष्णा बावळेकर, लक्ष्मणराव पाटणकर,रामकृष्ण इंगळे, सुरेश बारटक्के, अशोकराव कदम, सुभाष महामुनी आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, विलासपूर (गोडोली) येथील अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघ सुह्द भावनेस कृतीची जोड देऊन नेहमीच खारीचा वाटा उचलत आलेला आहे. पुणे जिल्ह्यातील डोंगर कपारीतील वसलेले माळीन गाव भु:स्खलनाने गाडले गेले त्यावेळी तसेच केरळमध्ये पुरामुळे झालेली मनुष्यहानी व वित्तहानी झाली तेव्हाही संघाने भरघोस आर्थिक मदत केली होती.