मोदींचे सातारा बेस्ट डेस्टिनेशचे स्वप्न साकार करा : श्री. छ. उदयनराजे ; सातारा जिल्ह्याचा कायापालट करून दाखवेन हा माझा शब्द

सातारा: देश राष्ट्रीय विचाराने पुढे निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देश हिताचे क्रांतीकारक निर्णय घेत आहेत. अशावेळी क्रांतीकारकांचा जिल्हा असलेला सातारा मागे राहता कामा नये. पंतप्रधानांनी सातार्‍यात येवून सातारकरांना जागतिक किर्तीचे पर्यटनस्थळ बेस्ट डेस्टिनेशन म्हणून सातारा विकसित करू, हा शब्द दिला आहे. सातार्‍याचा विकास आता झपाट्याने होणार आहे. त्यामुळे मोदींबरोबर राहणे सातारा जिल्ह्याच्या जनतेच्या हिताचे असल्यानेच मी तीन महिन्यातच राजीनामा दिला. सातार्‍यातील सर्व प्रश्‍न मार्गी लावण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी मला दिला आहे. फक्त सातारकरांच्या हितासाठीच मी ही लढाई लढत आहे. त्यामुळे या लढाईला जसा मोदींचा आशिर्वाद आहे तसाच सातारा जिल्ह्याच्या जनतेने आशिर्वाद द्यावा, मोदींचे बेस्ट डेस्टिनेशनचे स्वप्न साकार करण्यासाठी मला त्यांच्यासोबत संसदेत पाठवा, सातारा जिल्ह्याचा कायापालट करून दाखवेन हा शिवछत्रपतींच्या साक्षीने माझा सातारा जिल्ह्यातील जनतेला शब्द आहे, असे भावनिक उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज व भाजप, सेना महायुतीचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी काढले.
दि. 21 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सांगता सभांमध्ये जनतेला आवाहन करताना श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे. उन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता सातारा जिल्ह्याचे लाखो सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करत आहेत. देशातला सर्वात जास्त सैनिकांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे. शेकडो सैनिक देशाचे रक्षण करताना शहीद झाले आहेत. 370 कलम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत रद्द झाले असते तर माझ्या सातारा जिल्ह्यातील सैनिकांच्या कुटूंबावर आभाळ कधीच कोसळले नसते. 370 कलम रद्द झाल्यानंतर शहीदांच्या कुटूंबाना न्याय मिळाला आहे. या कुटूंबातील अनेकांनी व सीमेवर असलेल्या सैनिकांनी मला फोन करून मोदींना साथ देण्याचे आवाहन केले. कोणत्याही बड्या राजकीय नेत्यापेक्षा मला माझ्या जिल्ह्यातील सैनिकांनी केलेली सूचना आशिर्वाद वाटतो. म्हणूनच मी क्रांतीकारी निर्णय घेतला आणि तीन महिन्यात राजीनामा दिला. 370 कलमाचा आणि सातारा जिल्ह्याचा संबंध नाही असे म्हणणार्‍यांची टाळकी तपासली पाहिजेत. हा सातारा जिल्ह्यातील सैनिकांचा, शूरवीरांचा अपमान आहे. या अपमानाचा बदला दि. 21 ऑक्टोबरच्या मतदानादिवशी घेवून नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांना साथ द्या, असे आवाहन उदयनराजे यांनी केले आहे.
गेली 10 वर्षे मी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर राहिलो. अनेकदा प्रयत्न करूनही सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी स्वत:ला राष्ट्रीय नेते समजणार्‍या कुणीही मदत केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राचे सर्व रखडलेले प्रश्‍न सोडवतो, असा शब्द मला दिला गेला. माझ्या महाराष्ट्राच्या आणि सातारा जिल्ह्याच्या जनतेशिवाय मला दुसरे काही नको आहे, जर जिल्ह्याचे प्रश्‍न सुटणारच नसतील तर तिथे थांबून उपयोग काय होता? पवारसाहेब म्हणतात माझी चूक झाली पण चूक माझीच झाली मी 10 वर्षे तुमच्याबरोबर राहिलो आणि सातारा जिल्ह विकासापासून मागे गेला ती चूक दुरूस्त करण्यासाठीच मी नरेंद्र मोदी यांची सोबत करण्याचा निर्णय घेतला. जनता तुमच्या नेतृत्वाचा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील फरक भविष्यात अनुभवेल आणि सातारा जिल्ह्याचा कायापालट झालेलाही बघेल, असेही उदयनराजे म्हणाले.
सातार्‍यात मेडिकल कॉलेज, ग्रेड सेप्रेटर, कास धरण उंचीवाढ, नवीन खंबाटकी बोगदा, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र, कराड -चिपळूण रेल्वेमार्ग, पर्यटन स्थळांचा विकास, अजिंक्यतार्‍यावर शिवसृष्टी अशी अनेक कामे पाच वर्षात उभी करायची आहेत. ही सर्व कामे सत्तेच्या माध्यमातूनच होवू शकतात. सातारा जिल्हावासियांसाठी असे अनेक विकासाचे नवे मार्ग उभे करण्याचा शब्द पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. सातारा जिल्हा देशातील पहिल्या 15 जिल्ह्यांमध्ये पर्यटनात आघाडीवर असेल, असे स्वत: पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. तसे घडल्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे. हे सगळे शक्य होणार असल्यानेच आणि यामध्ये जनतेचे भले असल्याने मी ही निवडणूक लढवत आहे. त्यामुळे पावसाच्या बातम्यांनी भावनिक होवून समोर आलेले विकासाचे ताट लाथाडू नका, असे आवाहनही उदयनराजेंनी केले आहे.
किती संकटे आली तरी तुमच्यासाठी जगलोय भविष्यात वाटेल ते होवू दे तुमच्यासाठीच मरेन हा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेवून माझा तुम्हाला शब्द आहे. तुमचे आशिर्वाद वाया जावू देणार नाही, असे नमूद करून उदयनराजे पुढे म्हणाले, छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या निधनानंतर तुम्ही मला सार्वजनिक जीवनात आणले. खाच-खळगे सहन करत चढ- उतार पार करत इथपर्यंत आलो आहे. धरणग्रस्त, शेतकरी, महिला, विद्याथी, युवक, युवती, डॉक्टर्स, वकील, शिक्षक, अभियंते, सरकारी कर्मचारी, अल्प भूधारक, मजूर, कामगार, गरीब यांच्यासाठी जे जे करता येईल ते ते करत आलो आहे. जनतेप्रती कधी उतलो नाही, मातलो नाही कायम तुमचा विचार केला म्हणून चढत्या मताधिक्क्याने निवडून देत आला आहात. सातारा जिल्हा जगाच्या नकाशावरचे बेस्ट डेस्टिनेशन करण्याची नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा पूर्णत्वाला नेण्याची वाटचाल सुरू झाली असून या प्रक्रियेत तुम्ही सर्व जण सामील व्हा, त्यासाठी मला पुन्हा एकदा आशिर्वाद देवून मोदींसोबत पाठवा, असे आवाहनही उदयनराजे यांनी केले आहे.