भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांच्या समर्थकांचा भ्रमनिरास

सातारा (अजित जगताप): सब का साथ, सब का विकास या घोषणाबाजीला भुललेल्या सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. आता त्यांच्या समर्थकांची भ्रमनिरास झाली असून परतीच्या वाटा दिसतात का? याची चाचपणी सुरू झाली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सातारा जिल्ह्यातील आजी-माजी खासदार,आमदारांनी युतीच्या सत्तेवर आरूढ होण्यासाठी भाजप-सेनेत प्रवेश केला होता.पण,माजी खासदार श्री छ उदयनराजे भोसले,माजी आमदार मदनदादा भोसले, डॉ दिलीप येळगावकर,डॉ अतुल भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशिल कदम, दिगंबर आगवणे, शेखर गोरे यांची निराशा झाली.तर आ जयकुमार गोरे, आ महेश शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना एकदा यश मिळाले आहे. त्यांचे समर्थक खुश असले तरी इतरांना राजकीय पक्षांकडून लाभ मिळणार नाही हे उघड झाले आहे. राज्यात सत्तान्तराचे घोंगड भिजत पडले असताना आपल्याला हात रुमाल धुण्यासाठी संधी केव्हा मिळणार? याची अनेक समर्थक आतुरतेने वाट पाहत आहेत.भाजप सत्तेत सहभागी होणार नाहीत. नेत्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. सासू नको म्हणून वाटणी केली… नि सासू वाटणीला आली..अशी गत काही नेत्यांची झाली आहे.
महाराष्ट्र राज्यात भाजप-सेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सातारा जिल्ह्यातील भाजप-सेना आमदारांना मंत्री पद मिळण्याच्या आशा उंचावल्या होत्या. काहींनी नवीन सूट शिवून घेतला होता. समर्थकांनी ही नव्या पोशाखात मंत्रिमंडळ शपथविधी पाहण्याची तयारी केली होती.
पण, बदलत्या मौसम नुसार राजकीय समीकरण बदलून गेले आहे. भाजपने सत्तेचा दावा मागे घेतला तर सेनेला बहुमतासाठी संख्याबळ गाठता येईना. सर्वत्र अनिश्चितता वाढली असून राजकीय कारकीर्द कुठे घेऊन जाणार आहे?याची चिंता व्यक्त होऊ लागली आहे. सातारा जिल्हा बँक, सातारा जिल्हा परिषद, साखर कारखाना, सहकारी संस्था या मधील सत्ता स्थानाला आव्हान देण्याची रणनीती राष्ट्रवादी व काँग्रेसने आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फटका कोणाला बसतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.