उदयनराजेंची प्रतिष्ठा की पावसकरांंची निष्ठा, भाजप कोणाची पाठराखण करणार?

सातारा: काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो किंवा भाजप. सगळ्याच पक्षांना कोलणे हा उदयनराजेंचा स्वभाव आहे. काँग्रेसमध्ये असताना 2009 ला त्यांनी खासदारकीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी आणि भाजप अशा दोघांकडे गळ टाकले. त्यावेळी मेळावे नुसतेच नावाला घेतले. त्यांच्या बहुसंख्य चाहत्यांचा कल हा त्यावेळी राष्ट्रवादीच्या विरोधात अपक्ष म्हणून लढावे असा होता. मात्र हा कल कोलुन ते राष्ट्रवादीकडून लढले.
आतापर्यंतच्या राजकारणात त्यांनी अगदी योग्य निर्णय कोणता घेतला असेल तर तो हा. त्यांचे तिन्ही निवडणुकांतील मताधिक्य लाखालाखाने घटत गेले. मतदानापूर्वीचा माझ्या लेखांमध्ये हा उल्लेख आला आहे. उदयनराजेंवर छत्रपतींची गादी म्हणून प्रेम करणारे तरुण आहेत. मात्र जनसंपर्काच्या अभावामुळे व सातार्‍यातील संघर्षाच्या बातम्यांमुळे त्यांचा विरोधक वर्गही मोठया प्रमाणात तयार झाला होता. या दोन्ही वर्गांना पक्षाशी काही देणे घेणे नव्हते. त्यांच्या नकारात्मक प्रतिमेमुळे राजीनामा दिल्यानंतर मतदारसंघात एक वेगळेच वातावरण तयार झाले होते. ते भाजप श्रेष्ठींनी लक्षात घेतले नाही. विक्रम पावसकर हे जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांच्याबरोबर चार दोन बैठकाही झाल्या. त्या केवळ औपचारिकता म्हणून. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना काहीही किंमत उरली नाही. स्वतः उदयनराजेनीही ती दिली नाही. त्यांनी फक्त बडया उमेदवारांशी सलगी केली. त्यामुळे ग्रासरुटचे कार्यकर्ते झाकोळले गेले. तुमचे ठीक आहे, तुमचे नेतृत्व आम्ही मानतो. पण तुमच्या निष्ठावंतांचे आदेश पाळायला ते आमचे कोण? असा प्रश्न विचारला जाऊ लागला.
राष्ट्रवादीत असताना उदयनराजेंचे कट्टर हिंदुत्ववादी भिडे गुरुजी आणि पुरंदरेंचे संबंध छुपे नव्हते. भिडे गुरुजी त्यांच्या आदरस्थानी होते. पुरंदरेंशी त्यांचे चांगले संबंध होते. भीमा-कोरेगाव असूद्यात किंवा महाराष्ट्र भुषण, त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका उघडपणे मांडली. त्यांची ही भूमिका राष्ट्रवादीच्या विरोधात होती. मुस्लिम बहुल मतदारसंघातून निवडून येणार्‍या जितेंद्र आव्हाडांनी त्याला प्रखर विरोध दर्शवला. पण शरद पवारांमुळे नंतर सगळे काही शांत झाले. जिल्ह्यातील मुस्लिम, दलित समाजाने उदयनराजेंच्या या भूमिकेकडे त्यावेळी दुर्लक्ष केले होते.
निवडणुकीत पावसकरांनी भाषण केले कराडात. त्याचे पडसाद शहर किंवा फार तर कराड दक्षिण मतदारसंघात उमटले असतील, असे मानू. मग सातारा, वाईमध्ये मुस्लिमांच्या बैठक घेण्याचे कारण काय? मी भाजपमध्ये असलो तरी तुमचाच आहे, असे तर त्यांना भासवायचे नव्हते? कराडातल्या बैठकीला अतुल भोसले हजर नव्हते.जे काही मुस्लिम बांधव गोळा झाले होते ते त्यांच्या लागेबांधे असलेल्या चार नगरसेवकांनी गोळा केलेले होते. त्यांनी सांगता सभेत कमालीच्या ‘सौम्य’ भाषेत भाषणे केली होती,असे कदाचित उदयनराजेंचे मत असावे. माफी मागताना पावसकर चुकीचे बोलले म्हणून ती मागितली. पावसकरांवर आपल्या पराभवाचे खापर फोडताना ‘सौम्य’ भाषणे करणार्‍या आपल्या जवळच्यांना त्यांनी क्लीनचिट का दिली? यातून निष्ठावंतांनी काय अर्थ काढायचा? की निष्ठावंतां पेक्षा आपली प्रतिष्ठा महत्त्वाची आहे?
उदयनराजेंनी कोणाचे ऐकून हे पाऊल उचलले माहित नाही. पक्षाने जरी सबुरीचे धोरण ठेवले तरी ते माघार घेतील असे वाटत नाही. पक्षात प्रवेश करून दोन महिन्याच्या आत जिल्हाध्यक्षाला हटवण्याची अजब मागणी होणारे हे बहुदा देशातील पहिलेच उदाहरण असावे. निष्ठांना किंमत देणारा भाजप उदयनराजेंच्या हट्टापुढे झुकणार हे निश्चित. मग पावसकरांचे काय?
भाजपला उदयनराजेंविषयी आणि उदयनराजेंना भाजपविषयी पराकोटीचे प्रेम आहे, अशातला भाग नाही. भाजपला त्यांच्या सत्तेच्या राजकारणासाठी उदयनराजेंच्या राज्यातील वलयाचा फायदा घ्यायचा आहे. तर उदयनराजेंना आपल्या राजकारणासाठी भाजपच्या सत्तेचा फायदा हवा आहे. तर एकंदरीत हे असे आहे.
पश्चिम महाराष्ट्रात आता कुठे रुजायला लागलेली भाजप निष्ठावंतांवर अन्याय करण्याचीही रिस्क घेणार नाही. उदयनराजेच्या निवडणुकीतील पराभवापेक्षा पावसकरांवर झालेल्या आरोपांमुळे सहानुभूतीचे वातावरण पावसकरांच्या बाजूने आहे. होऊ घातलेल्या पदाधिकारी निवडीत पावसकरांचा सन्मान राखणे भाजपची अपरिहार्यता असेल. याचवेळी उदयनराजेंना न दुखावण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे. सता स्थापनेच्या गोंधळात सातारा जिल्ह्यातील बदललेल्या राजकारणातील पुढच्या घटना रोचक आणि उत्सुकता वाढवणार्‍या असतील.
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर उदयनराजे 2009 ला राष्ट्रवादीचे खासदार झाले. अतुल भोसले यांची दोस्ती निभावताना त्यांनी लगेचच कराड उत्तरच्या तिकीटावर दावा ठोकला. त्याचा हा राजहट्ट शरद पवारांनी मान्य केला. आधी श्रीनिवास पाटील मग बाळासाहेब पाटील यांची तिकिटे उदयनराजेंच्या हट्टामुळे नाकारली गेली. श्रीनिवास पाटील शांत राहिले कारण त्यांच्याकडे पवारांशी असलेल्या दोस्तीचे मोठे पद होते. बाळासाहेब शांत बसणे शक्य नव्हते. त्यावेळी कराड उत्तरच्या निवडणुकीत काय झाले हा इतिहास आहे. भाजपला हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यावयाचा घयायवचा आहे.