सैन्यभरतीच्या आमिषाने युवकाची साडेचार लाखाची फसवणूक

सातारा: सैन्यात भरती करतो असे सांगून पोगरवाडी (ता. सातारा) येथील तेवीस वर्षीय युवकाची 4 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तामजाईनगर सातारा येथील अजित संपत भोसले याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सूरज विजय घोरपडे (वय 23) रा.पोगरवाडी यांने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. मराठा इन्फंट्रीमध्ये लष्करी अधिकार्‍यांची ओळख आहे असे सांगून भोसले याने सूरज कडून भरतीसाठी त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे व आधी तीन लाख व नंतर एक लाख साठ हजार असे चार लाख साठ हजार रुपये घेतले. कोल्हापूर येथे लष्कर भरती असल्याच्या भोसले याने भूलथापा दिल्या. मात्र भरती प्रक्रिया होत नसल्याचा संशय बळावल्याने सूरज याने बारकाईने चौकशी केली असता भोसले याचा बनाव उघड झाला .पैसे माघारी देण्यापोटी भोसले याने त्याच्या एका मित्राच्या खात्याचा दोन लाख तीस हजार रुपयांचा चेक दिला. मात्र तो सुध्दा चेक वटला नाही. शिवाय भोसले याने सूरजला सारखे फोन करू नको म्हणत शिविगाळ केली. आर्थिक फसवणुकीची फिर्याद भोसले याच्या विरोधात दाखल झाली आहे.