Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीसातार्‍यात रस्त्यावर पाणी पण राजकीय बदलाबाबत शुकशुकाट

सातार्‍यात रस्त्यावर पाणी पण राजकीय बदलाबाबत शुकशुकाट

सातारा: (अजित जगताप) महाराष्ट्राची पहाट ही मोठ्या हादर्‍याने होते. यापूर्वी देशाने अनेक सर्जिकल स्ट्राईक बघितले. पण कालच्या पहाटेचा सर्जिकल स्ट्राईकाचा सर्वांनाच धक्का बसला. पण सातारा शहरात रस्त्यावर पाणी पण राजकीय बदलाबाबत शुकशुकाट जाणवला आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा शिरकाव झाला. त्याची फारशी दखल सातारकरांनी घेतली नसल्याचे सिध्द झाले आहे.
सकाळी विविध प्रसारमाध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार येईल अशी जोरदार चर्चा झाली. हाच धागा पकडून अनेकांनी अभिनंदनासाठी संभाव्य मंत्र्यांची खातरजमा व शुभेच्छा देण्यासाठी जोरदार तयारी केली. शुभकार्याला विघ्न यावं अशा पद्धतीने चर्चेला सुध्दा लाजवेल अशी घटना घडली. दोन ध्रुवातली टोक एकत्र आली. आणि अनेकांचे स्वप्न भंग झाले. शिवसेनेचे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार हे मुख्यमंत्री असे समीकरण समजून प्रसार माध्यमांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नापेक्षा या बातमीची पेरणी केली. पेरणी झाल्यानंतर काढणी, मोडणीला आपल्याशिवाय दुसर कोण नाही. असा आडाका बांधला. पण वृत्तवाहिनीवर शपथविधीचा सोहळा आखो देखा हाल पाहून अनेकांची झोपमोड झाली. एकमेकांना बातमीची खात्री करून घेतली. आणि सर्वांचा नूर पालटला.
सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यानंतर अजित पवार यांचा शब्द पक्षांतर्गत मान्य केला जातो. असा गोड गैरसमज अनेकांना झाला होता. आजच्या सकाळी हा गैरसमज दूर झाला. आणि वास्तवता लोकांसमोर आली.त्यामुळे अनेकांना राजकारण हे न समजणारे कारण आहे याची खात्री पटली. सकाळी भाजपाचे आ.शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी गेले. त्यांच्यासमोर अस काही घडलं याची मला काही कल्पना नव्हती असे स्पष्ट करून आ.भोसले यांनी मौन राखले. कारण भाजप आणि राष्ट्रवादी याच्यामध्ये आ.भोसले यांचे वजन आहे. या वजनामागे दोन्ही पक्षाचे नेते आहेत. याची त्यांना जाणीव झाली होती. शपथविधीनंतर सातार्‍यात जल्लोष होईल अशी खुणगाठ बांधण्यात आली होती. पण सातार्‍यातील पोवई नाक्यावर रस्त्यावर पाणी वाहत होेते. याचा विसर काही नगरसेवकांना पडला होता.त्यातच शुकशुकाट जाणवल्याने कार्यकर्त्यांना फटाक्यांची आतिषबाजी, पेढे वाटप करताना संकोचित वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांनी हाताची घडी (घड्याळ नव्हे) , तोंडावर बोट ठेवण्यात धन्यता मानली.
सातारा शहर परिसरात दिवसभर फेरफटका मारला असता बदलत्या राजकीय समीकरणाचे विश्‍लेषन करण्याचा अधिकार सातारकर नागरिकांना मिळाला असल्याचे दिसून आलेले आहे. कारण यापूर्वी प्रसारमाध्यमांनी जे काही वाचकांच्या गळी उतरवले त्यामध्ये शपथविधीचा कुठेही उल्लेख नसल्याने शेर आठवला. गम नही पडने का, गम नही सोचने का….गम हे इस बात का जहा हम पडे वहा .. ये खबर नही थी….अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular