जिल्हा बँकेचे कामकाज राज्यातच नव्हे तर देशात अग्रगण्य: गिरीश कुबेर

सातारा: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कृषी विकासाची यशोगाथा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दैनिक लोकसत्ताचे मुख्य संपादक व प्रसिद्ध अर्थ तज्ञ  गिरीष कुबेर, यांचे हस्ते व महाराष्ट्र विधानपरिषदेचे अध्यक्ष ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांचे अध्यक्षतेखाली व बँकेचे अध्यक्ष आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले व सर्व संचालक मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.याप्रसंगी गिरीष कुबेर म्हणाले, शेतकर्‍यांनी शेती विषयक कामकाजाचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे. शेती वगळता सर्व उत्पादनांची निर्यात होते. पिकाचे उत्पादन जास्त झाले तरी व दर चांगला मिळत असतानाही निर्यात केली जात नाही. कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनाचा दर ठरवण्याचा निर्णय घेवू दिला पाहिजे. शेतकर्‍यांनी शेतीचे अर्थकारण, हवामान व व्यवस्थेमध्ये होणारे बदल ओळखून जागतिक बदलांना सामोरे गेले पाहिजे. आज जागतिक मातीदिन आहे व जिल्हा बँक निर्मित शेतकर्‍यांना उपयुक्त ठरेल अशा कृषी विकासाची यशोगाथा या पुस्तकाचे प्रकाशन ही चांगली बाब आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज उत्कृष्ठ असल्यामुळे बँकेने राज्यातच नव्हेतर देश पातळीवर चांगले यश संपादन केले आहे. शेतकर्‍यांना यशस्वी करणेसाठी सातारा जिल्हा बँकेने शेतकर्‍यांची शेतीकडे बघण्याची सकारात्मकता वाढवली आहे, ही अभिमानाची बाब  आहे. बँक शेतकर्‍यांसाठी शेती व शेती पुरक व्यवसायासाठी अर्थपुरवठा करते. देशात शेती व्यवसाय करणेसाठी उपलब्ध साधनांची कमतरता, बाजारपेठ, बाजारभाव इत्यादि आव्हाने आहेत. शेती व्यवसाय तंत्रशुध्द व शास्त्रोक्त पध्दतीने करणेची गरज निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या किंमती ठरविणेचा अधिकार शेतकर्‍यांना नसलेने शेतकर्‍यांनी संघटीत होणे गरजेचे आहे. शेती व्यवसायात बदल करणे, शाश्वत शेती व्यवसाय करणे, लघुउद्योगांचा विकास करणे, आधुनिक पध्दतीने शेती करुन उत्पादनात वाढ करणे व शेतकर्‍यांना त्यांचे उत्पादित मालाच्या किंमती ठरविणेचे स्वातंत्र्य  हवे असे सांगितले. शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काची जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे. शेतकरी सुशिक्षित असला पाहिजे व त्यांनी अनुदानासाठी शासनाकडे आग्रह धरु नये असेही त्यांनी सांगितले.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, कृषी विकासाची यशोगाथा हे पुस्तक शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरेल. शेतकर्‍यांनी शेतीविषयक आधुनिक ज्ञान उपलब्ध करुन घेतले पाहिजे.  शेती व्यवसाय करीत असताना शेतीपूरक व्यवसाय केले पाहिजेत. आजचे पिढीला शेती व्यवसायाची जाणीव करुन दिली पाहिजे. भारत हा विकसशील देश असून शेती हा प्रमुख व्यवसाय असलेने शेती व्यवसाय तंत्रशुध्दा पध्दतीने केला पाहिजे. बँकेचे कामकाज अत्यंत चांगले आहे .आंतरराष्ट्रीय पातळीवर बँक गेलेशिवाय राहणार नाही . बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले यामध्ये त्यांनी बँकेच्या विविध कर्ज व ठेव योजनांची माहिती दिली. सातारा जिल्ह्यातील शेतीच्या विकासात जिल्हा बँकेचे मोठे योगदान आहे. ही देशातील एक अग्रगण्य बँक आहे. शेतकरी व संचालकांच्या दूरदृष्टी  मुळेच बँकेची भरभराट झाली आहे. बँकेकडून नफ्याच्या 45  टक्के वाटा हा शेतकर्‍यांना दिला जातो. बँकेमुळे शेती व शेतीपूरक व्यवसायात क्रांती झाली आहे. याचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूनेच बँकेने हा कार्यक्रम हाती घेतला असलेचे त्यांनी आवर्जून सांगितले. ज्या शेतकर्‍यांचा सत्कार केला आहे त्यांच्याकडून प्रत्येक तालुक्यातील माहिती गोळा करून शेती विकासाच्या बाबतीत धोरणे तयार करण्यात येणार आहेत. जिल्हा बँक ही फक्त कर्जच देत नसून शेतीच्या प्रगतीतही सहकार्य करते. या पुस्तकाचा लाभ जिल्हयातील  शेतकरी सभासदांना उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त केली व या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्ती छापून नाबार्ड व रिझर्व्ह बँक यांना उपलब्ध करुन दिल्या जातील असेही सूचित केले.संशोधक नंदिनी चव्हाण म्हणाल्या, सामाजिक बांधिलकेच्या भावनेतून शेतकर्‍यांना सहज सुलभ सोई-सुविधा प्राप्त करून देवून बँकेने त्यांच्या प्रगतीत फार मोठे योगदान दिलेले आहे. शेतकर्‍यांना ही बँक म्हणजे आपली बँकफ वाटण्याइतपत आत्मियता बँकेने निर्माण केली आहे. यावेळी  रामदास कदम व मनोहर साळूंखे या शेतकर्‍यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, यावेळी यशवंत किसान विकासमंचची स्थापना करण्यात आली. तसेच प्रतिष्ठीत व यशस्वी शेतकर्‍यांचा  मान्यवरांचे हस्ते सत्कार करणेत आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे व्यवस्थापक सुजित शेख यांनी केले.यावेळी संचालक प्रभाकर घार्गे, आ. बाळासाहेब पाटील, प्रदीप विधाते, नितीन पाटील, दत्तानाना ढमाळ, प्रकाश बडेकर, राजेंद्र राजपुरे, अनिल देसाई, राजेश पाटील, शिवरूपराजे यशवंतराव निंबाळकर-खर्डेकर, संचालिका कांचन साळूंखे, सुरेखा पाटील, बँकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे तसेच जिल्ह्यातील शेतकरी बांधव, विविध वृत्तवाहिन्याचे प्रतिनिधी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने यांनी सभेस उपस्थित मान्यवर व सभासद प्रतिनिधींचे आभार मानले.