नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून 3 कोटी 77 लाख 56,400 रुपयांची मदत मंजुर

सातारा: महाराष्ट्र राज्यासह पाटण तालुक्यात माहे ऑक्टोंबर-नोव्हेंबर 2019 मध्ये मोठया प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते तर माहे जुलै-ऑगस्ट 2019 या दोन महिन्यातही झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पाटणसारख्या ग्रामीण आणि डोंगरी भागातील घरांची मोठया संख्येने पडझड झाल्यामुळे अनेक कुटुंब बाधित झाले होते. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तसेच घरपडझड झालेल्या बाधितांना लवकरात लवकर आर्थिक मदत मंजुर करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे केली होती त्यानुसार राज्य शासनाने पाटण तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना एकूण 2 कोटी 24 लाख व घरपडझड झालेल्या बाधितांना एकूण 1 कोटी 53 लाख 56,400 रुपये अशी एकूण 3 कोटी 77 लाख 56,400 रुपयांची आर्थिक मदत मंजुर केली असून सदरची सर्व मदत पाटणचे तहसिलदार यांचेकडे शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय यांनी दि.16 डिसेंबरच्या आदेशानुसार नुकसानग्रस्तांना व बाधितांना लवकरात लवकर देणेकरिता वर्ग केली असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी दिली आहे.
आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या माहितीमध्ये म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्यासह पाटण तालुक्यात माहे ऑक्टोंबर-नोव्हेंबर 2019 मध्ये मोठया प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसामध्ये तसेच माहे जुलै-ऑगस्ट 2019 या दोन महिन्यातही झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामध्ये पाटण तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शेतातील उभ्या शेतपिकांचे तसेच डोंगरी व दुर्गम भागातील घरांचे पडझड होवून मोठे नुकसान झाले होते.
या सर्व नुकसानग्रस्तांच्या तसेच बाधितांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाने तात्काळ करुन नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळणेकरीताचे प्रस्ताव लवकरात जिल्हाधिकारी कार्यालय तसेच आयुक्त कार्यालय यांचेमार्फत राज्य शासनाकडे सादर करावेत याकरीता पाटण तालुक्याच्या ठिकाणी संबधित सर्व अधिकार्‍यांच्या अनेकदा बैठका घेवून त्यांना सुचना केल्या होत्या.
बैठकामधून केलेल्या सुचनावरुन लवकरात लवकर या यंत्रणांकडून सदरचे पंचनामे करुन घेवून पाटण तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तसेच घरपडझड झालेल्या बाधितांना लवकरात लवकर आवश्यक ती आर्थिक मदत मंजुर करणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे पत्रव्यवहार करुन आग्रही मागणी केली होती त्यानुसार राज्य शासनाने पाटण तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना एकूण 2 कोटी 24 लाख व घरपडझड झालेल्या बाधितांना एकूण 1 कोटी 53 लाख 56,400 रुपये अशी एकूण 3 कोटी 77 लाख 56,400 रुपयांची आर्थिक मदत मंजुर केली आहे. अवकाळी पाऊस तसेच माहे जुलै-ऑगस्ट मध्ये नुकसान व बाधित झालेल्यांचे महसूल, कृषी,ग्रामविकास विभागाने पंचनामे करुन मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता त्या सर्वांना शासनाने मदत मंजुर केली आहे. असे सांगून ते म्हणाले,पाटण तालुक्यात माहे ऑक्टोंबर-नोव्हेंबर 2019 मध्ये मोठया प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण 2999.75 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते तर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची संख्या 12 हजार 332 एवढी होती.
यामध्ये फळपिके सोडून जिरायत पिकावरील बाधित क्षेत्र व फळपिके सोडून बागायत पिकावरील बाधित क्षेत्र यांचा समावेश असून या सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना ही मदत देण्यात येणार आहे तसेच जुलै-ऑगस्टच्या अतिवृष्टीमध्ये पडझड झालेल्या एकूण 2500 घरांचे पंचनामे करण्यात आले होते त्यामध्ये 2496 कच्ची घरे व 04 पक्की घरांना आवश्यक असणारी मदत मिळावी याकरीता निधीची मागणी करण्यात आली होती त्यानुसार 1 कोटी 53 लाख 56,400 रुपयांचा निधी हा घराची पडझड झालेल्या बाधितांना मंजुर करण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या आदेशावरुन विभागीय आयुक्त यांच्याकडे जमा करण्यात आलेल्या मदतीतून जिल्हाधिकारी, सातारा यांना जिल्हयातील सर्व तालुक्यांना मदत मंजुर करण्यात आली असून दि.16 डिसेंबर रोजीच्या आदेशानुसार अवकाळी पावसामुळे व अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी व बाधितांना आर्थिक मदत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी,सातारा यांच्या आदेशावरुन काढण्यात आले आहेत.
सदरचे आदेश व निधी पाटणचे तहसिलदार यांना प्राप्त झाला असून राज्य शासनाने आपण मागणी केल्याप्रमाणे पाटण तालुक्यातील शेतकर्‍यांना व बाधितांना सर्वच्या सर्व आर्थिक मदत मंजुर केलेबद्दल आ.शंभूराज देसाईंनी शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.