दुष्काळी जनतेच्या येरळवाडी तलावातील पाणी खाजगी उद्योजकांच्या घशात

सातारा : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या माण-खटावच्या जनतेला पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. दुष्काळ हा त्यांच्या पाचवीलाच पुजला आहे. असे भयानक वास्तव असताना. येरळवाडी तलावातील पाणी एका खाजगी उद्योजकाच्या कारखान्याला खुलेआम दिले जात आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी राजकीय दबावाखाली जनतेच्या तोंडच्या पाणी विकत असल्याची चर्चा आहे. दरम्यान आठ दिवसात येरळवाडी तलावातील पाणी उपसा बंद न केल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दुष्शन पवार यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे.
खटाव तालुक्यातील जनतेला बारमाई पाणी मिळावे यासाठी ब्रिटीश सरकाने लॉर्ड बोकील यांच्या कल्पकतेतून 1906 साली येरळवाडी तलावाच्या निर्मितीला प्रारंभ केली. आसमानी व सुलतानी अडचणीनंतर राज्यात पडलेल्या दुष्काळावेळी 1978 साली या तलावाचे काम पूर्णत्वाकडे गेले. पावसाळ्यात पुर्वी हा तलाव दुथडी भरून वहात होता. पण अलिकडच्या काळात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने या तलावात पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या खटाव तालुक्यातील गारवडी, मांजरवाडी, मोळ, मांडवे, पाचवड, गारूडी अशा 6 गावांना व आवळेपठार गावठाण, कठरेवस्ती, पाटीलवस्ती अशा 7 वाड्यांमधील 5 हजार 223 नागरिकांना, 981 जनावरांना 6 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येरवाडी तलावाच्या परीसरातील अंबवडे, गोरेगाव, पिंपरी, मरडवाक, दातेवाडी, मराठानगर, चितळी, मायणी, मासुर्णे, निमसोड, होळीचेगाव, शिरसवडी, गुरसाळे, गोपूज, खरशिंगे, औंध आदी गावांना येरळावाडी तलावातून पिण्याचा पाणी योजनेव्दारे दिले जाते.
सध्या येरळवाडी तलावातील पाणी पातळी घटली आहे. तरीही खाजगी उद्योजक 25 हाऊस पॉवरच्या पंपानी पाणी उचलून खाजगी कारखान्यांना घेवून जात आहेत. त्यामुळे परीसरातील विहरींची पाणी पातळी खोलवर गेली आहे, तर काही विहीर आटल्या आहेत. सध्या क्षारयुक्त पाणी पिण्यामुळे लोकांच्या आरोग्य बिघडले आहे. तर दुसर्‍या बाजूला महाकाय जनरेटरच्या कर्कश आवाजाने अनेकांची झोप उडाली आहे. दोन विभिन्न राजकीय पक्षाशी संबधीत असणारे हे उद्योजक तलावातील पाणी पळवत आहेत. असे असतानाही पाटबंधारे विभागाचे अधिकारी आपले हात आले करून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सदर तलावातील पाणी हे ऊस उत्पादीत पिकासाठी न देण्याचा निर्णय झालेला आहे. तरीही काही शेतकरी दिवस-रात्र मोटारी लावून येरळवाडी तलावातील पाणी उपसा करत आहेत. शेतकर्‍यांच्या मोटारी बंद करा नंतर आम्ही आमचा जनरेटर बंद करतो असा पवित्र खाजगी उद्योजकांनी घेतल्यामुळे बिकट प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत मनसे नेते धर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यासाठी या परीसरात जनजागृती मोहिम हाती घेतली असल्याचे मनसे तालुका अध्यक्ष दिंगबर शिंगाडे, वैभव सकट यांनी दिली आहे.