लोकसभेची निवडणूक ही एक परिवर्तनाची चळवळ म्हणून पहावे : खा. उदयनराजे

सातारा : लोकसभेची निवडणूक ही निवडणूक म्हणून पाहू नका तर एक परिवर्तनाची चळवळ म्हणून पहावे. तसेच देशात व राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सातारा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटीतील म. गांधी सभागृहात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचार नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. आनंदराव पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विजयराव कणसे, प्रदेश सरचिटणीस रजनीताई पवार, जिल्हाध्यक्ष सौ. धनश्री महाडिक, अजितराव पाटील, भीमराव पाटील, अशोकराव पाटील, अविनाश फाळके, निवास थोरात, राजेंद्र चव्हाण, नम्रता उत्तेकर, बाबासाहेब कदम, अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, रविंद्र झुटींग, किशोर बाचल, मनोजकुमार तपासे, बाळासाहेब क्षीरसट, जितेंद्र पाटील, खंडाळ्याचे माजी सभापती गुरुदेव बरदडे, हिंदुराव पाटील, राम हादगे, पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, मालन नरळकर यांची विशेष उपस्थित होती.
पुढे बोलताना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्याचे नेतृत्व स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केले होते. देशाचे उपपंतप्रधानपदावर त्यांनी केले होते. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनीहंी दिल्लीत मंत्री म्हणून काम केले होते. आताची होणारी निवडणूक ही परिवर्तनाची चळवळ म्हणून पहावे, ही चळवळ म्हणजे काय? त्याचे मूळ कारण काय? सध्या सत्तेत आहेत ते का नको आहेत, कारण आज त्यांनी घेतलेले निर्णय योग्य होते का? आज कारखाने बंद आहेत, सेंट्रींग व गवंडी कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. जीएसटीमुळे व्यापार्‍याचीही अवस्था बिकट आहे. देशात बदल घडवून आणायचा असेल तर बदल घडवायला हवा. आज आपली अवस्था रोबो सारखी झाली आहे. राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितल्याप्रमाणे भारत महासत्ता बनायला हवा. विरोधकांना आता घरचा रस्ता दाखवायला हवा. प्रगत लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे.
अ‍ॅड. विजयराव कणसे म्हणाले, खा. उदयनराजे भोसले यांना एक नंबरने विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून प्रचाराला गती घ्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचा उमेदवार हा आपलाच उमेदवार समजून ही परिवर्तनाची लढाई जिंकावी असे आवाहन केले.
आ. आनंदराव पाटील म्हणाले, ही निवडणूक देशाला दिशा ठरविणारी ठरणार आहे. काँग्रेस पक्षाकडे हवे असलेले उमेदवार आहेत. महाराजांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे. सातारा जिल्ह्यास स्व. यशवंतराव चव्हाण, कै. प्रेमिलाताई चव्हाण (काकी) याची परंपरा आहे. मात्र मोदींनी सोडेचार वर्षे लोकांना उल्लू बनविले, आता त्यांची जादू संपली आहे. देशाचा पंतप्रधान हा आपल्या विचाराचा झाला पाहिजे. महाराज विक्रमी मतांनी निवडून आल्यावर त्यांना मंत्रिपद मिळायला हवे.
खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचार नियोजनाच्या बैठकीस आज जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती.