एमआयडीसीला विरोध करण्यासाठी कोरेगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक

सातारा : 2012 साली पडलेल्या भीषण दुष्काळात शेतकर्‍यांना पाणी मिळाले नाही, म्हणून निदान त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली परिसरात एमआयडीसी उभी करण्याचा संकल्प शासनाने केला. पण सध्या निसर्गाने साथ दिल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला असताना पाच वर्षानंतर एमआयडीसी अधिकार्‍यांनी पुन्हा जामीन संकलित करण्यासाठी नोटीसा पाठवल्या असल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आणि राज्यमंत्री व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्यासमोरच शेतकर्‍यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
आज सातारा जिल्हा नियोजन भवनात शासकीय स्तरावर बैठक घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने कोरेगाव तालुक्यातील पाडळी, वाठार किरोली, दातेवादी, आर्वी, नागझरी या गावातील शेतकरी सहपालक मंत्री व अधिकार्‍यांना भेटण्यासाठी आले होते. पाच वर्षापूर्वी लागवडी खालील क्षेत्र सोडून पडीक जमिनीत एमआयडीसी उभी करावी असे ठरले असताना त्याला तत्वतः मान्यता मिळाली होती. पण आज परिस्थिती बदलली असून काही शेतकरी अल्पभूधारक बनले आहेत. असे असताना वडी, कळंबी, थोरवेवाडी यांचा भूमी अभिलेखाचा नकाशा बघून प्रस्ताव तयार केला. त्याची कल्पना ग्रामस्थांना दिलेली नाही. मुळातच एमआयडीसीसाठी 15 टक्के लोकांनी विरोध केला तर निर्णय कायद्याने रद्द होतो. त्यामुळे संपूर्ण गावांचा एमआयडीसीला विरोध असताना अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना नोटीस पाठवून वेठीस धरल्याचे आक्रमक शेतकर्‍यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त करत पालकमंत्री खोत यांच्यासमोर खडेबोल सुनावले. यावेळी भीमराव पाटील, सागर शिवदास, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, विकास भोसले, जयदत्त शिरसाट व ग्रामस्थ-शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
शेतकर्‍यांना उध्वस्त करणार्‍या प्रवृत्तीला अखेर नियतीच धडा शिकवेल. आमच्या जमिनी घेऊन आम्हाला तुमच्या दारात तुकडे मागायला बोलवून पिढ्या बरबाद करत आहात का, असा सवाल शेतकरी करत होते. अखेर आक्रमक शेतकर्‍यांचे म्हणणे एकूण घेतल्यानंतर ना. खोत हे शासकीय विश्रामगृहाच्या दिशेने रवाना झाले. यावेळी त्यांच्यासमवेत खाजगी सावकारी रकेटमध्ये चर्चेत असलेली व्यक्ती भावूंच्या सोबत शासकीय वाहनात बसलेले पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. एकीकडे शेतकर्‍यांची बाजू घ्यायची आणि दुसर्‍या बाजूला खाजगी सावकारीत नाव असणार्‍या व्यक्तीला सदा जवळ करायचं हे भाऊ कसं काय? असा मार्मिक सवाल स्वाभिमानी शेतकरी विचारू लागले आहेत.