रयत मार्फत 17 डिसेंबर रोजी इस्माईलसाहेब मुल्ला पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन

साताराः रयत शिक्षण संस्थेची मानद सचिव पै. इस्माईलसाहेब मुल्ला यांच्या 44 व्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन रयत शिक्षण संस्थेच्यावतीने रविवार दि. 17 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 11.30 वा. यशवंतराव चव्हाण इन्स्टि.ऑफ सायन्स सातारा येथे केले आहे. संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य प्रा.डॉ.एन.डी. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी संस्थेचे कायदा सल्लागार व इस्माईलसाहेब मुल्ला यांचे सुपूत्र अ‍ॅड. दिलावरसाहेब मुल्ला हे उपस्थित राहणार आहेत.
पै. इस्माईलसाहेब मुल्ला यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्‍या अहमदनगर येथील डॉ. राजेंद्र धामणे व डॉ.सौ. सुचेता धामणे यांना यावर्षीचा इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, रोख रक्कम रू. 25,000/-, शाल व बुके असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. राजेंद्र धामणे आणि डॉ. सुचेता धामणे यांनी माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हयातील मनोरूग्ण, समाजातील उपेक्षित घटक यांच्यासाठी असामान्य कार्य केले असून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. तरी या समारंभासाठी सातारा शहरातील शिक्षणप्रेमी व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्रिं.डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी केले आहे.