ऑलंपिकला प्रतिनिधीत्व करणे हेच आपले स्वप्न : रुचिरा लावंड

वडूज : नेमबाजी स्पर्धेत आत्तापर्यंत अनेक छोटी-मोठी बक्षीसे मिळाली आहेत. शिवछत्रपती पुरस्काराने चांगले नैतिक बळ मिळाले आहे. यापुढच्या काळात ऑलंपिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याबरोबरच देश पातळीवरील अर्जुन पुरस्कार मिळविणे हेच आपले स्वप्न आहे. असे प्रतिपादन खातगुण येथील राष्ट्रीय खेळाडू रुचिरा लावंड यांनी व्यक्त केले.
खटाव पंचायत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. यावेळी सभापती संदिप मांडवे, गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
रूचिरा लावंड म्हणाल्या, शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक ठिकाणी छोटे-मोठे सत्काराचे कार्यक्रम झाले. मात्र वडूज, खातगुण येथील सत्कार आपल्या घरचे सत्कार वाटले. लोकांनी दाखविलेल्या प्रेमामुळे आपण भारावून गेलो आहोत.
सभापती श्री. मांडवे म्हणाले, गुणी क्रिडापट्टूंचे कौतुक झाल्याने त्यांचे नैतिक बळ वाढते. तालुक्यात जास्तीत जास्त चांगले खेळाडू तयार व्हावेत यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो. रुचिराच्या पुरस्काराने तालुक्याचा नावलौकीकात चांगली भर पडली आहे. प्रा. प्रमोद राऊत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गटविकास अधिकारी श्री. मेंढेवार, आर. एन. पवार, धनंजय क्षीरसागर, चंद्रकांत देशमुख यांची भाषणे झाली. कार्यक्रमास निमसोडचे उपसरपंच संतोष देशमुख, ज्ञानेश्‍वर इंगवले, प्राचार्य राजाराम बरकडे, उंबर्डेचे माजी सरपंच शिवाजी पवार, ज्ञानेश्‍वर शिंदे, हरीभाऊ गुजर, भिकू कंठे, रणसिंगवाडीचे पोलीस पाटील सुनिल रणसिंग, नितीन जाधव, शरद कदम, शंकर लावंड सर, चंद्रकांत लावंड, अक्षय फडतरे, अरुण लावंड, सौ. लावंड आदिंसह मान्यवर उपस्थित होते.