सातारा जिल्ह्यातील पालिकांचे कामबंद आंदोलन स्थगित

सातारा : नगरपालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्या शासन स्तरावर मान्य झाल्याने नगरपालिका व नगरपंचायत कर्मचार्‍यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यामुळे आंदोलनास सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सर्व पालिकांचे कामकाज बुधवारी नेहमीप्रमाणे सुरू होते.
नगरपरिषद व नगरपंचायतीमधील सर्व कर्मचार्‍यांना 1 जानेवारी 2016 पासून विनाअट सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. परंतु शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने दि. 1 जानेवारी रोजी संघटनेने राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला जिल्ह्यातील पालिका व नगरपंचायतींनीही पाठिंबा दर्शविला.सातारा, कर्‍हाड , फलटण, महाबळेश्वर, पाचगणी या पालिका व वडूज, खंडाळा या नगरपंचायतींमधील कर्मचार्‍यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केले होते. दरम्यान, कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाची पालिका अप्पर प्रधान सचिव नितीन गद्रे यांनी मुंबई येथे भेट घेतली. संघटनेच्या मागण्यांवर चर्चा करीत पालिका कर्मचार्‍यांचा सातव्या वेतन आयोगाच्या मान्यतेच्या अध्यादेशात समावेश करण्याचे आश्वासन दिले. हा अध्यादेश सर्व पालिकांना माहितीसाठी पाठविण्यात आला आहे. मागण्या मान्य केल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पालिका कर्मचार्‍यांनी आपले आंदोलन मागे घेत कामकाज सुरू केले आहे.