वडूज येथे पाणी फौंडेशनच्या चित्र प्रदर्शनास मोठा प्रतिसाद

वडूज : येथील पंचायत समितीच्या आवारात पाणी फौंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या चित्रप्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळाला. विविध शाळांतील शेकडो शालेय विद्यार्थ्यांसह तालुक्यातील मान्यवरांनी भेट देवून प्रदर्शनाची सविस्तर पाहणी केली.
नेहमीची येतो पावसाळा ही उक्ती निदान खटाव-माण तालुक्यात तरी कालबाह्य होऊ लागल्याचे दिसून येत आहे.दुष्काळी परस्थितीमुळे दोन्हीही तालुके पाण्याच्या बाबतीत अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतून जात असून शेतकर्‍यांपुढील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. हे परिस्थितीत शेतकरी हिताला प्राधान्य देत गावागावात जलसाक्षरता आणि त्यातून जल व्यवस्थापनाबाबत जागृती व्हावी या उद्देशाने चित्रप्रदर्शन भरवण्यात आले असल्याची माहिती पानी फौंडेशन जिल्हा समन्वयक बाळासाहेब शिंदे व तालुका समन्वयक जितेंद्र शिंदे यांनी दिली.
गेल्या काही वर्षात तालुक्यातील अनेक गावांनी जलसंधारणाची कामे शास्त्रशुध्द पध्दतीने केल्याने पिढ्यानपिढ्या टँकरची मागणी करणार्या गावांची संख्या घटली आहे. या चित्रप्रदर्शनात ज्या गावांनी लोकसहभागातून कामे केली त्या गावातील पुर्वीची व सद्यस्थिती वास्तवतेने मांडण्यात आली आहे. टँकर सुरू व्हावा म्हणून जे ग्रामस्थ रस्त्यावर आंदोलन करत होती त्याच ग्रामस्थांना उपरती होऊन आपल्या गावात पडणारे पाणी आपल्याच गावात जिरवायचे ही उपरती झाली. परिणामी रखरखत्या उन्हात हातात टिकाव,खोर,घमेले घेऊन रखरखत्या उन्हात घाम गाळून जलसंधारणाची कामे केली व आज ती गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली.सरकारकडे पाण्यासाठी आंदोलन करणारे तेच ग्रामस्थ वॅाटर हिरो बनले याचे प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रभावी उद्बोधन करण्यात आले. त्याबरोबरच याही वर्षी तालुक्यातील जास्तीत जास्त गावांनी जलसंधारणाच्या कामांत भाग घेऊन आपल्या गावाच दुष्काळातून समृध्दीकडे यशस्वी प्रवास व्हावा असे आवाहन करण्यात येत होते.
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, पंचायत समिती सभापती कल्पना मोरे,उपसभापती संतोष साळुंखे,माजी सभापती संदीप मांडवे,जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते, प्राचार्य कांबळे यांनी देखील प्रदर्शनाला भेट देऊन या उपक्रमाचे कौतूक केले. तालुका समन्वयक श्री. साबळे यांनी आभार मानले.