पानवनच्या श्रमकरी रणरागिणींनी डिझेलसाठी क्षणात उभे केले 50 हजार रुपये

म्हसवडः पानवण, ता. माण येथे वॉटर कप स्पर्धेसाठी सुरु असलेल्या पोकलँड मशिन्स डिझेलअभावी उभ्या असल्याचे समजल्यावर श्रमदान सुरु असलेल्या शिवारातच श्रमदानासाठी आलेल्या महिलांनी ग्रामसभा घेतली आणि पाच मिनिटांत संसाराचे रहाटगाडगे चालवण्यासाठी अडीअडचणीला उपयोगी पडतील म्हणून पदराला गाठ बांधून ठेवलेले पैसे सुमारे 50 हजारांची रक्कम क्षणार्धात उभी केली. मात्र ही रक्कम तटपुंजी ठरणार असून पानवण दुष्काळमुक्त होण्यासाठी ग्रामस्थांच्या श्रमदानाला समाजातील दानशूर व्यक्तींच्या आर्थिक मदतीची जोड हवी आहे.
दुष्काळाला हद्दपार करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेत उतरलेल्या पानवणकर ग्रामस्थांनी स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून प्रचंड उत्साहात श्रमदान सुरु ठेवले आहे. दररोज सुमारे सातशे ग्रामस्थ श्रमदानासाठी भल्या सकाळी श्रमदानासाठी शिवारात येत आहेत. परंतु स्पर्धेत यश मिळवण्यासाठी आणि जलसंधारणाच्या दर्जेदार कामासाठी श्रमदानाबरोबरच जेसीबी, पोकलँड आदी यांत्रिक कामाचीही गरज आहे. गावात सध्या विविध दात्यांनी दिलेल्या 5 पोकलँड मशिन्सच्या सहाय्याने काम चालू आहे. मात्र मशिन्सच्या डिझेलसाठी उभी केलेली लोकवर्गणी संपली असून, डिझेलअभावी मशिन्स उभ्या असल्याचे समजल्यावर श्रमदान सुरु असलेल्या शिवारातच श्रमदानासाठी आलेल्या महिलांनी ग्रामसभा घेतली आणि पाच मिनिटांत सुमारे 50 हजारांची रक्कम उभी केली.
गावची लोकसंख्या सुमारे 3200 इतकी असून गावातील 65 टक्के लोक कराड, कोल्हापूर आदी भागांत ऊसतोडणीसाठी सहा महिने जातात. तर काहीजण पुणे, मुंबई येथे रिक्षा, टँक्सी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. कारखान्यांचा गाळप हंगाम संपल्यानंतर ऊसतोडणी कामगार गावी परतले असून, त्यांनी श्रमदानाचे तुफान आणले आहे.
मात्र कष्टकरी आणि गावातील संख्येने मोजक्या असलेल्या नोकरदार मंडळींनी जमा केलेली आर्थिक पुंजी संपली असून डिझेल अभावी गावात काम करत असलेली मशिन्स आज उभी राहिली. या मशिन्ससाठी दररोज सुमारे पाचशे लिटर डिझेल लागत आहे. स्पर्धेसाठी उरलेल्या पंधरा दिवसांचा विचार केला तर फक्त डिझेलसाठी अजून पाच ते सहा लाख रुपयांची गरज आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना यांनी मदत करावी, असे आवाहन पानवण ग्रामस्थांनी केले आहे.