अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना अमर्याद मोफत प्रवासाचा लवकरच सकारात्मक निर्णय : परिवहन मंत्री दिवाकर रावते

कराड : राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातर्फे स्मार्ट कार्ड देण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रवास मर्यादा आठ हजार किलोमीटर ठेवण्यात आले आहे.दरम्यान पत्रकारांच्या एस. टी. प्रवासाची मर्यादा पूर्वीप्रमाणे अमर्याद करावी अशी मागणी करणारे निवेदन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना कराड येथे असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्युजपेपर्स ऑफ इंडिया आणि प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात आले आहे.
सातारा – सांगली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांबरोबर आयोजित बैठकीकरिता परिवहनमंत्री दिवाकर रावते कराड येथे आले होते. यावेळी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्युजपेपर्स ऑफ इंडिया व प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गोरख तावरे, दैनिक सकाळचे पत्रकार सचिन देशमुख, दैनिक तरुण भारतचे पत्रकार देवदास मुळे यांनी मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव उपस्थित होते.
गेल्या 12 वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळाकडून मोफत असलेल्या पत्रकारांच्या एस. टी. प्रवासावर शासनाने 8000 की. मी.ची मर्यादा घातल्याने पत्रकारांना प्रवास करताना मर्यादा आलेल्या आहेत. तेंव्हा पत्रकारांच्या मोफत प्रवासाची सेवा पूर्वीप्रमाणे अमर्याद मोफत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गेल्या12 वर्षांपासून शासन पत्रकारांना मोफत प्रवास सवलत पास देत होते परंतु यावर्षी राज्यातील अधिस्वीकृती पत्रकारांना स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे. यामध्ये अचानक प्रवासासाठी 8000 की.मी. ची मर्यादा घातली आहे. ती सवलत पूर्वीप्रमाणे अमर्यादित मोफत प्रवास सवलत चालू ठेवावी अशी आग्रही मागणी करणेत आली. सध्या राज्यातील अधिस्वीकृती धारक पत्रकारांना परिवहन महामंडळांकडून स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे. त्याचबरोबर आठ हजार किलोमीटर प्रवासाची मोफत सुविधा दिलेली आहे. याचा अधिकाधिक फायदा राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनी घ्यावा. अमर्याद मोफत प्रवासाबाबत विचारविनिमय करून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी हमी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गोरख तावरे यांना दिली.