काम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी ; पाटण येथील शेतकऱ्यांची मागणी

पाटण :- पाटण तालुक्यात गेले दोन अडीच महिने सतत मुसळधार पडत असलेल्या पाऊसाने पिकांचे झालेल्या नुकसानी संदर्भात पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाकडे वेळोवेळी मागणी करून देखील आजपर्यंत कोणतीच दखल घेतली नाही. शेतकऱ्यांचा अंत न पाहता शासनाने पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. अन्यथा पाटण तहसील कार्यालयासमोर गुरांडोहरासह आंदोलन करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना उर्मट भाषेत प्रतिउत्तर करणा-या अधिका-याला पाठीशी घालण्यासाठी सातारा जिल्हा कृषी विभागातील अधिकारी- कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. अशा कृषी अधिकारी- कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन पाटण येथील शेतकऱ्यांनी तहसिलदार यांच्यामार्फत शासनाला दिले आहे.

पाटण तालुका कृषी अधिकारी यांनी एका खासगी कंपनीची जाहिरात बाजी करण्याच्या हेतूने मल्हारपेठ ता. पाटण येथे शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात शेतकऱ्यांचा बाजूने विक्रमबाबा पाटणकर यांनी ओला दुष्काळ संदर्भात विचारणा केली असता या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना उर्मट भाषेत प्रतिउत्तर करण्यात आले. यावेळी विक्रमबाबा पाटणकर यांनी या अधिकाऱ्याच्या कानशिलात भडकावली होती. या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून खाजगी कंपनीसाठी शेतकऱ्यांचा भरवलेला मेळावा. शेतकऱ्यांच्या वर दाखल केलेले खोटे गुन्हे. याची चौकशी करून या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीची वर्तणुक करणा-या अधिका-याला पाठीशी घालण्यासाठी काम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या सातारा जिल्ह्यातील कृषी अधिकारी – कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन शासनाकडे मागणी केली आहे.