प्राधिकरणाच्या आवारात आज भरणार मंडई

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा ढिसाळ कारभाराचा फटका समस्त सातारकरांना बसत आहे.  गेल्या पाच वर्षात कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता कार्यालयाला मिळत नसल्याने याबाबत आ. शिवेंद्रराजे यांनी कार्यकारी अभियंत्याची लवकरात लवकर नियुक्त करावी असा ईशारा दिला होता. मात्र दहा दिवस
उलटले तरी याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्याने गुरूवार दि. 7 जुलै रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास आ. शिवेंद्रराजे प्राधिकरणाच्या आवारात भाजी मंडई भरवून आंदोलन करणार आहेत.
सातारा शहरातील पुर्व भागातील सदरबझार कँप, कांगा कॉलनी, जय जवान हौ. सो.करंजे गावठाण, शाहुपुरी, गेंडामाळ झोपडपट्टी  या  भागाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो. तसेच सातारा शहरातील मंजूर झालेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे कामही अद्याप सुरूच आहेत. गेल्या पाच वर्षात प्राधिकरणाला कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता न मिळाल्यामुळे संपुर्ण पाणी पुरवठ्याची योजनेची बोंबाबोंब झाली आहे.  त्यामुळे ठेकेदाराची 8 कोटीची बिले थकल्याने संबंधित ठेकेदार कंपनीने या योजनेतूनच अंग काढून घेतले आहे. प्राधिकरणाच्या सावळ्या गोंधळात पूर्व भागातील नागरिकांनाचे हाल मात्र सुरू आहेत. सदर बझार विशेषत: गोडोली गावठाणात लिकेजस्चे प्रमाण जास्त असल्याचे सुरळीत पाणी पुरवठा होईनासा झाला आहे.
या वादाच्या पार्श्‍वभूमीवर खा. उदयनराजे भोसले यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे पुर्ण वेळ कार्यकारी अभियंता मिळावा अशी मागणी केली होती. मात्र प्राधिकरणाच्या सदस्य समितीचे सचिव संतोष कुमार यांच्याकडे अद्यापही सक्षम पर्याय नसल्याने पुर्ण वेळ अभियंत्याची नियुक्ती झाली नाही. या गोष्टीच्या निषेधार्थ आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आक्रमक उचलले असून प्राधिकरणाच्या जागेतच गुरूवारी सकाळी 10.30 वाजता मंडई भरवली जाणार आहे. या आंदोलनांची जिल्हा प्रशासनाला रितसर कल्पना देण्यात आली असून प्राधिकरणाच्या विरोधात शिवेंद्रराजे समर्थक व सातार्‍यातील सामाजिक संघटनांचे सदस्य सामुहिक संताप व्यक्त करणार आहेत. प्राधिकरणाचा कार्यकारी अभियंत्याच्या पदभार पुण्याचे अधिक्षक अभियंत्याकडे सोपविण्यात आला आहे. सातारकरांनी पाणी पुरवठ्याच्या समस्या घेऊन पुण्याला जायचे काय ? असा संतप्त सवाल नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अविनाश कदम यांनी केला आहे.