महागठबंधन जातीयवादी पक्षाचा धुव्वा उडवेल : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड : राज्यातील सहकारी संस्था काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याचा राग काढण्यासाठी भाजप मुद्दाम सुडाचे राजकारण करत आहे. सहकार चळवळ दुर्लक्षित ठेवून काँग्रेस विरोधात रोष वाढेल का? याची रणनीती भाजप आखत आहे. ऊसदराचा प्रश्न कसा चिघळेल, याचाही प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचे सुडाचे राजकारण फार दिवस चालणार नाही. काँग्रेस देशव्यापी पक्ष आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेससह सर्व पक्षांचे महागठबंधन जातीयवादी पक्षाचा धुव्वा उडवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
रेठरे बुद्रुक व जुळेवाडी (ता. कराड) येथील संपर्क बैठकींमध्ये ते बोलत होते. रेठरे बुद्रूकचे जेष्ठ नागरिक जयवंतराव दमामे अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, एनएसयुआयचे राष्ट्रीय सचिव शिवराज मोरे, रेठरे बुद्रुक विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष उत्तमराव मोहिते, मदनराव गणपतराव मोहिते, अमरसिंह मोहिते, कृष्णत चव्हाण-पाटील, अशोक सूर्यवंशी, आबा सूर्यवंशी, दिपक पाटील-शेरेकर, ऋतुराज मोरे, जुळेवाडीच्या शिवशंकर विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष शशिकांत साळुंखे, अरविंद साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला केवळ 31 टक्के मते मिळाली. 69 टक्के मतांची विभागणी झाल्याने कमी मते मिळूनही भाजप विजयी झाले. पण आता देशातील सर्वच पक्ष एकत्र येत आहेत. नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुकात त्याचा परिणाम दिसला. तीन राज्यातील भाजप सरकार पाडून जनतेने काँग्रेसला निवडून दिले. राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीसह दहा पक्ष एकत्र आले आहेत. तोच दुसर्‍या बाजूला बुडणार्‍या जहाजातून लोक जसे उडया मारतात तसे भाजपचे मित्रपक्ष सोडून जात आहेत.
ते म्हणाले, मोदीमित्र उद्योगपतींनी तीन लाख कोटींची कर्जे बुडवली आहेत. त्यांना अभय देण्यामध्ये केंद्रातील सरकार मग्न आहे. त्यांच्या कर्जाचा खड्डा भरण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी सर्वसामांन्याच्या खिशावर या सरकारचे लक्ष आहे. मुंबई-गुजरात बुलेट ट्रेनचा आपल्याला काय फायदा, असा सवाल करत त्याऐवजी शेतकर्‍यांना सोयी पुरवणे गरजेचे होते. गेल्या साडेचार वर्षात केवळ जुमलेबाजी, फक्त घोषणा व सवंग लोकप्रियतेसाठी योजना जाहीर केल्या. यातून कुणाचेच समाधान झालेले नाही. त्यामुळे सरकार गोंधळले आहे. मोदींच्या करिष्म्यावर विसंबून राहिलेल्या राज्यातील सरकारनेही सर्वांची घोर निराशा केली आहे.
ते म्हणाले, भाजप सरकारच्या स्वच्छ प्रशासनाचा फुगा फुटला आहे. तीन राज्यातील पराभवाची मालिका चालूच राहणार आहे. येत्या निवडणुकांमध्ये शेतकर्‍यांची दुःखे माहिती असणार्‍या काँग्रेसला जनता खंबीर साथ देईल, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
दिपक पाटील म्हणाले, जयवंतराव भोसले यांना काँग्रेसने आमदार केले. त्या घरामध्ये आमदार करण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्ये आहे. पण आता तेथे दुसरा कुणी आमदार होणार नाही. कृष्णा पवार, आर. के. हिवरे यांची भाषणे झाली. आबा सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. बाळकृष्ण कार्वेकर, अशोक सूर्यवंशी, सनी मोहिते, अरविंद साळुंखे, शशिकांत साळुंखे यांनी स्वागत केले.