राजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद  

साताराः नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या संकल्पनेतून  आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद मैदान वरील  राजधानी राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनास विविध भागातून आलेल्या बैल, खोंड, खिलार, गीर जातीच्या तसेच शेळी-बोकड जनावरांच्या सहभागाने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्या 27 फेब्रुवारी प्रदर्शनाचा अखेरचा दिवस असून प्रदर्शनास जिल्ह्यातून येणार्‍या शेतकरी आणि शहरी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
काल 26 रोजी झालेल्या पशु-पक्षी प्रदर्शनात बैल गटात दत्तात्रय जाधव, खातगुण यांच्या बैलास प्रथम, सुनील माने, सातारा यांच्या बैलास द्वितीय तर अजित शिंगटे, खडकी यांच्या बैलास तृतीय क्रमांक मिळाला. 6 ते 12 वयोगटाच्या खोंड गटात ललगुणच्या ओंकार सुतार यांच्या खोंडास प्रथम, डोळेगावच्या गोकुळ गोडसे यांच्या खोंडास द्वितीय तर मर्ढेच्या धर्माजी शिंगटे यांच्या खोंडास तृतीय क्रमांक मिळाला तसेच गोडोली, साताराच्या महेश नलावडे यांच्या गीर जातीच्या खोंडास प्रथम क्रमांक मिळाला. म्हैस गटात शेळकेवाडीच्या मच्छिंद्र कदम यांची म्हैस प्रथम क्रमांकाची ठरली. शेळी गटात राजाळेच्या बापू केसकर यांच्या आफ्रिकन बोर यास प्रथम तर बिटल गटात शेखर चव्हाण यांच्या जनावराने द्वितीय क्रमांक मिळवला.
खिलार गटात फरीद शेख यांची गाय प्रथम तर खातगुणचे सूर्यकांत गुरव यांच्या गाईस द्वितीय क्रमांक मिळाला. सातार्‍याचे गुलाबराव यादव यांना उत्कृष्ट गो-पालक पुरस्काराने गौरविण्यात आले.  अंगापूर वंदनचे पशुधन अधिकारी डॉ. विजय सावंत यांनी सर्व पशुपक्षी यांची चिकित्सा केली. डॉ. प्रशांत भोईटे, सातारारोड, गोदरेज पशु आहार मॅनेजर डॉ. मिलिंद शिंदे आणि त्यांचे सहकारी डॉ. सुयोग शिंदे यांनी त्यांना सहकार्य केले.