मायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांच्या नेतृत्वाखाली रणरागिणींचे आंदोलन

पाटण: मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या अरेरावी व मनमानीच्या निषेधार्थ मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांच्या नेतृत्वाखाली पाटण तालुक्यातील रणरागिणींसह महाराष्ट्र सैनिकांनी नुकतेच निसरे फाटा येथे रास्तारोको आंदोलन केले.
कमी व्याजदराचे आमिष दाखवून गरजू महिलांना कर्जवाटप करावयाचे आणि वारेमाप व्याजदराने दहशत दाखवून कर्जवसुली करायची असे तंत्र अवलंबणार्‍या मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या जाचहाटामुळे वैतागलेल्या माताभगिनींनी मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा महिन्यांपासून व्यापक जनजागरण सुरु केले आहे. त्या अंतर्गत ठिकठिकाणी जाहीर सभा, मोर्चे, धरणे, ठिय्या आदी स्वरुपातील आंदोलनांद्वारे कंपन्यांविरोधात आवाज उठवला आहे. त्यानुसार महिलांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि वसुली अधिकार्‍यांची दहशत मोडीत निघावी या मागण्यांसाठी नुकतेच निसरेफाटा ता. पाटण येथे हे उत्स्फूर्तपणे रास्तारोको आंदोलन झाले.
निसरे, मल्हारपेठ, दिवशी, मारुली हवेली, साकुर्डीवस्ती, उरुल, चरेगाव आदी ठिकाणच्या महिलांनी उत्स्फूर्तपणे एकत्रीत येत निसरे फाटा येथे हे आंदोलन केले. मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर प्रमुख पदाधिकार्‍यांसमवेत निसरे फाटा येथे आले. त्यावेळी त्यांच्या आगमनाबरोबरच माता भगिनींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि संदीपदादांच्या जयजयकाराच्या घोषणा सुरु केल्या. कोण म्हणतो देत नाय, घेतल्याशिवार राहत नाय, कर्जमाफी आमच्या हक्काची नाही कुणाच्या मनमानीची अशा घोषणा देत सुमारे अर्धा तास कराड- चिपळूण राज्य मार्ग अडवून ठेवला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक बस व खासगी वाहनातील महिलांनीही खाली उतरुन या प्रश्‍नाची माहिती घेतली व आपणासही मायक्रोफायनानन्स कंपन्यांचा आलेला क्लेषदायक अनुभव विषद केला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संदीपदादा मोझर म्हणाले की, लिहिता वाचता न येणार्‍या महिलांनाही केवळ आधार कार्डच्या झेरॉक्सवर हजारो रुपये देणार्‍या आणि वसुलीबाबत दहशत माजवणार्‍या कंपन्यांचे खरे रुप आता समाजासमोर आले आहे. नोटबंदीच्या काळातील झालेले कर्जवाटप हे कोणाचेतरी काळे धन पांढरे करण्याचा प्रकार आहे. नाममात्र व्याजाने शासनाकडून घेतलेले कर्ज 24 ते 30 टक्के व्याजाने सर्वसामान्य कुटूंबातील महिलांना देणार्‍या सर्वच मायक्रोफायनान्स कंपन्यांची चौकशी व्हावी. रिजर्व्ह बँकेच्या शिष्टमंडळासमवेत जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात झालेल्या बैठकीत वसुलीबाबत ठरलेल्या नियमावलीला हरताळ फासणार्‍या वसुली प्रतिनिधींवर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. वसुलीच्या दहशतीने घाबरलेल्या माता-भगिनींवर आज आत्महत्त्या करण्याची वेळ आली आहे. त्यास कारणीभूत ठरणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी प्रसंगी कायदा हाती घ्यावा लागला तरी चालेल. मात्र, मायक्रोफायनान्स कंपन्यांना धडा शिकवूच, अशी आमची भूमिका आहे.
या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन पवार, मनसेचे जिल्हा सचिव सागर पवार, मनसेचे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे पाटण तालुकाध्यक्ष दिलीप सुर्वे (तात्या), मधुकर जाधव, भरत गाडे, हणमंत पवार, अधिक पाटील, संतोष वांगडे, गणेश पवार, सतीश घाडगे, आबासाो माने, दादासाहेब सुर्वे, नामदेव सुर्वे, दिनकर गायकवाड, प्रमोद नलवडे, अजित पवार, दिपक सुतार, मोहन सुतार आदींसह परिसरातील महिला व महाराष्ट्र सैनिक तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ. मनिषाताई चव्हाण व परिसरातील महिलांनी या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

मायक्रोफायनान्स कंपन्यांचे मुख्यालय असलेल्या चैन्नई, कोलकाता आदी परराज्याच्या न्यायालय क्षेत्रून महिलांना नोटीसा येत असून तेथील न्यायालयात उपस्थित राहण्याविषयी पत्रे येत आहेत. ज्याप्रमाणे महिलांना त्यांच्या घरी येऊन कर्जाचे वाटप केले त्याचप्रमाणे मायक्रोफायनान्सच्या कर्जाबाबतच्या न्यायालयीन प्रक्रिेयेसाठी त्या त्या स्थानिक न्यायालयाच्या कार्यक्षेत्राची मर्यादा असावी, असे मतही संदीपदादांनी यावेळी त्यांच्या भाषणात व्यक्त केले.