रविंद्र बेडकिहाळ यांना मसाप कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

फलटण : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने ज्येष्ठ प्रकाशक कै.रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यावर्षीचा मसाप कार्यकर्ताफ पुरस्कार मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ (फलटण) व गिरीश दुनाखे (सोलापूर) यांना जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 112 व्या वर्धापन दिनानिमित्त मसाप माधवराव पटवर्धन सभागृहात (टिळक रोड) रविवार, दिनांक 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित एका विशेष समारंभात डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती, ज्येष्ठ मूर्तिशास्त्र तज्ज्ञ डॉ.गो.बं.देगलूरकर यांच्या हस्ते व मसाप अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात येणार आहे. तसेच यावर्षीचा राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट मसाप शाखा फिरता करंडक मसापच्या पिंपरी चिंचवड शाखेला याच समारंभात देण्यात येणार आहे, अशी माहिती मसाप अध्यक्ष प्रा.मिलींद जोशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.
प्रा.मिलींद जोशी पत्रकात पुढे म्हणतात, रविंद्र बेडकिहाळ हे मसापचे ज्येष्ठ मार्गदर्शक असून त्यांनी फलटणच्या मसाप शाखेतर्फे गेली 27 वर्षे साहित्य प्रसार चळवळीचे काम केले आहे. या शाखेमार्फत महाराष्ट्रातील पहिले असे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन गेल्या सात वर्षापासून सुरु केले आहे. तसेच शिवार साहित्य संमेलन, पाठ्यपुस्तकातील लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला, बांधावरचं कवि संमेलन, विद्यार्थ्यांसाठी साहित्यिक स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती व्याख्यानमालेत सहभाग असे विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत. तसेच सातारा जिल्ह्यात त्यांच्या व जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकणी (सातारा) व डॉ.सोपानराव चव्हाण (पाटण) यांच्या सहकार्याने पाटण, सातारा शाहुपुरी, सातारा एम.आय.डी.सी., कोरेगाव, रहिमतपूर, कराड ग्रामीण येथे मसापच्या नव्याने शाखा केल्या व त्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात साहित्यिक व वाचन संस्कृती चळवळ गतिमान केली. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून हा उत्कृष्ट कार्यकर्ताफ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
बेडकिहाळ यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे  महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, भारती विद्यापीठाचे कार्यवाह, आमदार डॉ.विश्‍वजीत कदम,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, श्री सद्गुरु व महाराजा संस्था समुहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके), सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे व माजी अध्यक्ष अरविंद मेहता, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे व कोषाध्यक्ष सौ.सुनिताराजे पवार, मसाप फलटणचे अध्यक्ष प्राचार्य रविंद्र येवले, सातारा जिल्ह्यातील मसाप शाखा प्रमुख, महाराष्ट्र राज्य प्रसारमाध्यम व वृत्तपत्रे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांच्यासह शैक्षणिक, प्रसारमाध्यम, साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.