देशाच्या शिक्षण व्यवस्थेला दिशा देण्याचे काम कर्मवीरांच्या रयतने केले ; खा. शरद पवार यांचे प्रतिपादन 

सातारा : शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे एकमेव साधन आहे. यापासून गोरगरीब  समाजातील एकही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी त्यांच्या शिक्षणाची काळजी कर्मवीरांनी शंभर वर्षापूर्वी घेतली म्हणूनच ग्रामीण भागातील गुणवत्तेला संधी तर मिळालीच तसेच देशाच्या शिक्षणव्यवस्थेला योग्य दिशा देण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेने केले आहे असे गौरवपूर्ण उदगार माजी केंद्रीय कृषीमंत्री व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  खा. शरदराव पवार यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेने कर्मवीर समाधी परिसर येथे आयोजित केलेल्या 131 व्या कर्मवीर जयंती समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे होते.
कर्मवीरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करून खा. शरदरावजी पवार पुढे म्हणाले कर्मवीरांनी समाजातील सामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा विचार केला व त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य  वेचले त्यामुळेच गेली शंभर वर्षे समाज संस्थेच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला. आज आधुनिक काळात समाजाला आवश्यक असलेले ज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी संस्था कटिबद्ध असून त्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थांना देण्याचा प्रयत्न करत आहोत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, पुणे विद्यापीठाने कर्मवीरांना डी. लिट पदवी देऊन विद्यापीठाचाच सन्मान उंचावला आहे. खरेतर एका नामांकित विद्यापीठाने कर्मवीरांसारख्या चालत्या बोलत्या विद्यापीठाला दिलेली ही पदवी आहे. कर्मवीरांचा विचार मध्यवर्ती ठेवून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. या शिक्षणातून चारित्र्य आणि चरितार्थ या दोहोंची सांगड घालता आली पाहिजे. अण्णांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली, श्रेष्ठता दिली व वसतिगृहाच्या माध्यमातून सहजीवनाची व सहशिक्षणाची संकल्पना रुजवली. आजच्या काळात चॉईस बेसड् क्रेडीट सिस्टीमच्या माध्यमातून वेगवेगळ्या विद्यापीठातून ज्ञानाची देवाण घेवाण झाली पाहिजे ती आजची गरज आहे. हाच विचार कर्मवीरांनी शंभर वर्षापूर्वी शिक्षणक्षेत्रात रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण वाटचाल करूयात असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी केले. यावेळी कर्मवीरांच्या जीवनकार्याचा आढावा व संस्थेच्या प्रगतीचा आलेख संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी मांडला. यावेळी भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पाठविलेल्या शुभसंदेशाचे वाचन प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी केले. सर्व उपस्थितांचे आभार सहसचिव प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.  प्रा. संभाजी पाटील यांनी रयत गीत सादर केले.
कार्यक्रमास सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, संस्थेचे व्हा. चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, सुजित जगधने, डॉ. पल्लवी वर्धमाने, डॉ. भारती पाटील, डॉ. मोहन पाटील, सुधीर धुमाळ, प्रभाकर देशमुख, संस्था पदाधिकारीविलास महाडिक, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, कर्मवीर कुटुंबीय, जनरल बॉडी सदस्य, आजी माजी लाईफ मेंबर, वर्कर, शाखाप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, रयत सेवक, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.