1 जानेवारीला 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या युवक युवतींनो तहसील कार्यालयात जावून मतदार यादीत नाव नोंदवा : जिल्हाधिकारी श्वेता‍ सिंघल यांचे आवाहन

 

सातारा, दि.21 (जिमाका) : दि. 1 जानेवारी 2018 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होणार असलेल्या सहस्त्रक मतदारांचा शोध घेवून त्यांच्याकडून नमुना 6 भरुन घेण्यात येवून मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.  अशा मतदारांनी नजिकच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधुन नमुना 6 भरुन द्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता‍ सिंघल यांनी केले आहे.

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रमांतर्गत 21 व्या शतकाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ज्यांचा 1 जानेवारी 2000 रोजी जन्म झाला आहे व ज्यांना दि. 1 जानेवारी 2018 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होणार आहेत, अशा सहस्त्रक मतदारांचा  शोध घेवून मतदार यादीमध्ये नोंदणी करण्यात येणार आहे. अशा सहस्त्रक मतदारांनी पुढे येण्यासाठी प्रोत्साहनपर मोहिम आखण्यात येणार असून 18 ते 19 वयोगटातील सर्व तरुणांची मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.

सहस्त्रक मतदारांना नोंदणीसाठी आमंत्रीत करण्यासाठी ग्रामपंचायत, इस्पितळे, जन्मृत्युचे दाखले देणारी प्राधिकरणे इत्यादींच्या माध्यमातुनही सहस्त्रक मतदारांचा शोध घेण्यात येणार आहे. या प्रयत्नांना अनुसरुन जे सहस्त्रक मतदार नोंदणी करतील अशा मतदारांचा घरी जावून बीएलओ सत्कार करणार आहेत,  तसेच राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2018 रोजी तरुण मतदार याच्या समवेत त्यांना मी भारताचा सहस्त्रक मतदार आहे, असा लिहलेला खास बॅच देवून सत्कार करण्यात येणार आहे.  सहस्त्रक मतदारांनी त्यांचे छायाचित्र व मतदार ओळखपत्र त्यांच्या फेसबुक पेजवर टाकावे व डीईओ, सीईओ, ईसीआय यांच्याशी टॅग करावे यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात येणार आहे.

सहस्त्रक मतदारांची त्यांच्या महाविद्यालयांमध्ये किंवा अन्य योग्य ठिकाणी कॅम्पस अॅम्बेसीडर म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयामध्ये नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या इलेक्टोरल लिटरसी क्लब मध्ये पहिला सदस्य म्हणून त्याची नोंदणी करण्यात येणार आहे.  असे मतदार शैक्षणिक प्रवाहामध्ये समाविष्ट नसतील तर त्यांची ‘चुनाव पाठशाला’ मध्ये नोंदणी करण्यात येईल.