स्वच्छ सर्वेक्षणात सातारा जिल्हा देशात सर्वोत्कृष्ट ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सातारा जिल्ह्या सन्मानित

 

नवी दिल्ली, 2 : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2018’ स्पर्धेत राज्यातील सातारा जिल्हयाने बाजी मारत देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आज गांधी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सातारा जिल्ह्याला सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक सभागृहात केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने ‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदे’चे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ‘स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण 2018’ पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेश, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती, केंद्रीय शहरी व गृहनिर्माण मंत्री हरदिपसिंग पुरी, केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा आणि केंद्रीय पेयजल व स्वच्छता राज्य मंत्री रमेश जिगाजीनागी मंचावर उपस्थित होते. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल कार्यक्रमात सहभागी झाले. यासह कार्यक्रमास 68 देशातील प्रतिनिधी उपस्थित होते.
केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण – ग्रामीण 2018’ मोहिमेअंतर्गत दिनांक 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत देशभरातील सर्वच 718 जिल्हयांमध्ये स्वच्छतेच्या विविध निकषांवर सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यांतील निवडक गावे याप्रमाणे 6 हजार 980 गांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. महाराष्ट्रातील 34 जिल्हयांमधील 540 गावांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात विविध मानकांमध्ये सरस ठरून सर्वाधिक गुण संपादन करणारा सातारा जिल्हा देशात प्रथम आला आहे.
सातारा जिल्ह्याची सर्व निकषांवर सरस कामगिरी
सातारा जिल्हयातील 16 गावांची केंद्रीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली. तपासणी घटकांमध्ये प्रामुख्याने गावरस्त्यावरील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, बाजारस्थळे, धार्मिक ठिकाणांची शौचालय उपलब्धता त्यांचा वापर तसेच सार्वजनिक परीसरांची स्वच्छता यांची तपासणी करण्यात आली. यासाठी केंद्रशासनाने कंतार या त्रयस्थ संस्थेकडून परिक्षण करण्यात आले . यानुसार एकूण 100 गुण ठरविण्यात आले. यात संख्यात्मक व गुणात्मक आधारावर सेवास्तर प्रगतीचे ३५ गुण व ग्रामस्थांच्या प्रतिसादाचे ३५ गुण व थेट परिक्षणाचे ३० गुण यांद्वारे अंतिम गुण ठरविण्यात आले. सर्वनिकषांवर सातारा जिल्हा सरस ठरला असून जिल्हयाने देशात सर्वाधिक गुण मिळविले आहेत.
प्रधानमंत्री यांच्या हस्ते सातारा जिल्ह्याला गौरविण्यात आले. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव विजयसिंग नाईक निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पुरस्कार ग्रहण केल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रीयेत सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री निंबाळकर म्हणाले, सातारा हा राज्यात प्रथम प्रमाणित हगणदारी मुक्त जिल्हा आहे. स्वच्छतेबाबत लोकजागृती व्हावी आणि लोकांचा सक्रीय सहभाग असावा यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न केले. स्वच्छतेच्या सवयी आपल्या अंगी बाळगण्याचे उपक्रम राबविले. या स्वच्छ अभियानामध्ये विविध शासकीय विभागाने, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी, तसेच महिलांनी मोठी जबाबदारी पार पाडली, त्यामुळेच सातारा जिल्ह्याला हा पुरस्कार मिळाला, अशी श्री निंबाळकर यांनी प्रतिक्रीया नोंदविली.
सातारा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रीयेत ते म्हणाले, सातारा जिल्हा 2016 मध्येच हगणदारी मुक्त जिल्हा म्हणून प्रमाणित झाला होता. तसेच साता-याला प्रतिष्ठीत दर्पण पुरस्कारही मिळालेला आहे. पुढचा टप्पा हा घन, द्रव्य कच-याचे व्यवस्थापनाचा होता. त्यासाठी जिल्ह्यातील 213 ग्रामपंचायती निवडून ओल्या व सुखा कचरा वेगवेगळा करायचे गावाक-यांना प्रशिक्षण दिले. त्याप्रमाणे ओल्या कच-यापासून गांडूळ खताची निर्मिती करण्यात आली. हे गांडूळ खत शेतीसाठी वापरण्यात येते आहे, पर्यायाने रासायिक खतांचा वापर कमी झाला. गांडूळ खत निर्मितीमुळे प्रत्येक गावात रोजगार उपलब्ध झाला. घन कच-याचे एकत्रीकरण करून त्यातील ज्या कच-याचा पुर्नवापर होऊ शकत नाही. तो कचरा भंगारवाल्यांना देण्यात येते, त्यातून जिल्हा परिषदेला निधी मिळत आहे.
राज्य शासनाने प्लास्टीक बंदीचा घेतलेला निर्णय साता-या जिल्ह्यात राबविण्यासाठी, बचत गटांनी मोठी जबाबदारी पेलली असून जिल्ह्यातील 750 बचत गट कापडी पिशवी तयार करतात. यातून बचत गटांना दर महिण्याला 7 ते 7.5 हजार रूपयांचे उत्पन्न होत आहे.
मतदान करून स्वच्छतेबद्दलची स्थानीकांची मते जाणुन घेतली, निबंध स्पर्धा, वर्कृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणचे शौचालये, अंगणवाडी, शाळा, रूग्णालय, बाजाराचे ठिकाण, सार्वजनिक परिसर अशा सर्व सार्वजनिक ठिकाणाच्या स्वच्छतेवर भर देण्यात आला. आजचा मिळालेला पुरस्कार हा केवळ एका ठराविक कामासाठी मिळाला नसून संपूर्ण जिल्ह्यात राबविलेले सर्वसमावेशक बाबींचा परिणाम असल्याची प्रतिक्रीया श्री शिंदे यांनी दिली.