मागासवर्गीय निधीचा अपहार करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन : दादासाहेब ओव्हाळ

सातारा : विशेष घटक योजनेंतर्गत झालेल्या कामात कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार एका आरटीआय कार्यकर्त्याने काढलेल्या माहितीवरून उघड होत आहे. यामुळे कारवाईला सामोरे जाण्याच्या भितीने कृषि अधिकार्‍यांपासून कृषी सहाय्यक रजेवर जात आहेत. संबंधित अधिकार्‍यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, एकट्या कोरेगांव तालुक्यात सुनील जाधव या पर्यवेक्षाचे सजात पावने दोन कोटी रूपयांचा निधी विशेष घटक योजनेसाठी खर्च झाला असून सदरची कामे ही पहिल्या कामावरच मलमपट्टी करून तेच काम विशेष घटक योजनेत दाखवले तसेच पर्यवेक्षक पूर्वी ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी आरफळ मंडळ सातारा तालुका येथील माहिती घेतल्यास त्याचे व जिल्हा कृषी अधीक्षक जे.पी.शिंदे यांचा असलेला जिव्हाळा लक्षात येईल.
मागील दोन महिन्यांपूर्वी राज्याचे कृषी आयुक्त म्हणून श्री. केंद्रेकर यांची नियुक्ती झाली व सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तक्रारींची फाईल ओपन करून तात्काळ कारवाईच्या आदेशाच्या फैरी झडू लागल्या यावर उपाय म्हणून तिन्ही जिल्ह्यातील खाबुगिरी बहाद्दरांनी वर्गणी काढून एका कर्तव्यदक्ष अधिकार्‍याची तात्काळ बदली केली आणि साईचे अधिकारी यांची नेमणूक केल्याची चर्चा आहे.
या सर्व बाबीवरून कृषी कार्यालयामधील उपविभागीय अधिकारी, कोरेगाव पर्यवेक्षक तसेच इतर निवडक अधिकारी जिल्हा कृषि अधिक्षकांच्या इशार्‍यावर मजूर फेड्रेनशन, डी.डी.आर कार्यालय यांच्या नियमाला कोलदांडा दाखवून हुकूमत गाजवत आहेत. मागासर्वीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी असणार्‍या विशेष घटक योजनेचा निधी वाम मार्गाने खर्च करून स्वत:ची तुंबडी भरण्याचे काम करीत आहेत.
संबंधित अधिकार्‍यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अ‍ॅक्ट नुसार कारवाई करावी अन्यथा रिपाईतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.