नाभिक समाजाचा आरक्षणासाठी 7 सप्टेंबर पासून राज्यभर एल्गार….. ; 7 सप्टेंबर ला संपुर्ण महाराष्ट्रात श्री संतसेना महाराज पुण्यतिथी दिवशी राज्यकर्त्यांविरोधात निषेधाचा ठराव करुन जनआंदोलन उभारणार

 

पुसेसावळी  (प्रतिनिधी)   : नाभिक समाजाच्या न्याय हक्कासाठी राज्यभर साखळी पध्दतीने सामाजिक लढा तीव्र करण्याचा निर्णय राष्ट्रीय नाभिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव बिडवे यांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल रखुमाई मंदिर,बांद्रा मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे दत्ता अनारसे, कार्याध्यक्ष अंबादास पाटिल,जेष्ठ नेते शशिकांत चव्हाण,महासचिव

प्रभाकर फुलबांधे,सरचिटणीस दिलीप अनार्थे,विभागीय अध्यक्ष मारुती टिपुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाभिक समाजाचे प्रश्न व मागण्या मान्य व्हाव्यात, ही भावना प्रत्येक समाज बांधवांच्या मनामध्ये घर करुन आहे. अनेक वर्ष विविध अंगाने लढा व संघर्ष करुनही समाजाचे प्रश्न सुटत नाही, समाजाला न्याय मिळत नाही. राज्यकर्ते व शासनकर्तेही या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. आता मागण्या मान्य झाल्याच पाहिजे या करिता राज्यभर जनांदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या आंदोलनात्मक लढ्याचा आरंभ ७ सप्टेंबर २०१८ रोजी श्री. संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथी
पासुन करण्यात येणार आहे. राज्यभर विविध ठिकाणी होणाऱ्या पुण्यतिथी सोहळ्यानंतर उपस्थित असलेल्या समाजबांधवांच्या स्वाक्षरी घेऊन ठरावाचे जाहिरपणे वाचन करुन विविध ठिकाणी साखळी आंदोलनास प्रारंभ करण्यात येणार आहे.

.

अशा आहेत नाभिक समाजाच्या प्रमुख मागण्या- 

1)नाभिक समाजाचा अनुसुचित  जातीत समावेश करावा अथवा अनुसुचीत जातीप्रमाणे सर्व सोयीसुविधा मिळाव्यात.
3)व्यवसाय उभारणी व वृध्दीसाठी अल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करून द्यावे ,
4) मार्केट कमिटी,सहकारी साखर कारखाने,विविध कार्यकारी संस्था,शासकिय रुग्णालय,ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हापरिषद, नगरपालिका,महानगरपालिका, म्हाडा,सिडको,हुडको, बसस्थानक,शासकिय व निमशासकिय वसाहतीत असलेल्या व निर्माण होणाऱ्या शाॅपिंग सेंटरमध्ये सलुन
व्यवसायासाठी गाळा राखीव असावा
5) समाजास आर्थिक सहाय्य मिळण्याकरीता श्री. संतसेना महाराज आर्थिक विकास महामंडळ गठीत करावे अथवा मध्यप्रदेश,
राज्यस्थान,हरीयाणा या सरकारच्या धर्तीवर केशकला बोर्डाची स्थापना करावी.
6)शूरवीर जिवाजी महाले यांचे वास्तुरुपी भव्य स्मारक प्रतापगड व परिसरात दोन एकर जागेत उभारावे,यासाठी निधीची तरतुद करण्यात यावी
7)पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापुर येथील स्वामीनिष्ठ नरवीर शिवाजी काशीद यांच्या समाधी स्थळाच्या सभोवती दगडी बांधकाम असलेली संरक्षकभिंत उभारण्यात यावी,या स्थळाला पर्यटन स्थळ म्हणुन घोषीत करुन येथे सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी त्वरीत निधी मंजूर करावा.
8)सलून व्यावसायिकांनी दरवाढीचा
निर्णय घेतल्यानंतर ग्रामीण भागात ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व ग्रामसेवक गावपंचायत बोलावुन सलुनचे दर कमी करण्यासाठी दबाव आणतात, समाज बांधवांना बहिष्कृत करुन गावाबाहेर काढण्याच्या अन्यायकारक घटना आजही घडत आहेत असे करणाऱ्यांवर त्वरीत गुन्हा दाखल करुन त्यांचे पद रद्द करण्यात यावे.

 

नाभिक समाजाविषयी.. आसाम,आंध्रप्रदेश,मेघालय,बिहार,उत्तराखंड,तेलंगणा,तामिळनाडू, या राज्यात नाभिक समाज अनुसुचीत जातीत मोडतो तर महाराष्ट्रात नाभिक समाज इतर मागासवर्गीय प्रवर्गात आहे.

 

महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार नाभिक समाजाला अनुसुचीत जातीत समावेश करुन अनुसुचीत जातीनुसार आरक्षण देण्यात यावे अथवा अनुसुचीत जातीनुसार सर्व सोयीसवलती मिळाव्यात असा निर्णय  जाहीर न केल्यास श्री संतसेना महाराज पुण्यतिथी पासुन संपुर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल.
श्री भगवानराव बिडवे 
अध्यक्ष राष्ट्रीय नाभिक महासंघ