जवळच्या मतदान केंद्रावर पुनरीक्षण व नवमतदार नोंदणी करा :- श्रीरंग तांबे

पाटण:- ( शंकर मोहिते ) – पाटण तालुक्यामध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून त्यानिमित्ताने दर रविवारी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवमतदारांनी व ज्यांचे नाव अद्याप मतदार यादीत आले नाही अशा नागरीकांनी जवळच्या मतदान केंद्रावर संपर्क साधून नाव नोंदनी करावे असे अहवान पाटण उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी पाटण येथील इंधरानगर मधील मतदार पुनरीक्षण नोंदनी कार्यक्रम वेळी केले. यावेळी पाटणचे तहसिलदार रामहरी भोसले. यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीरंग तांबे पुढे म्हणाले भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमात १ सप्टेंबर २०१८ ते ३१ ऑक्टोम्बर २०१८ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारणेत येणार आहेत. या कार्यक्रमात दर रविवारी म्हणजेच दिनांक ३० सप्टेंबर, ७ ऑक्टोम्बर, १४ ऑक्टोम्बर, २१ ऑक्टोम्बर, २८ ऑक्टोम्बर या सर्व रविवारी ज्या – त्या गावातील प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मोहिमेचे आयोजन करणेत आले आहे. या दिवशी सर्व मतदान केंद्रावर संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून मतदार नोंदणीचे काम करणार आहेत. त्यामुळे पात्र व्यक्ती मतदार होण्यापासून वंचित राहू नये. यासाठी नाव नोंदणी, तसेच नाव वगळणे, मयत असेल तर तशी नोंद करणे अशी कामे मतदान केंद्रावर केली जाणार आहेत. यासाठी सर्व केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकानी मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना निवडणूक प्रशासनाकडून देणेत आल्या आहेत.
पाटण तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की १ जानेवारी २०१८ या अहर्ता दिनांकावर ज्या व्यक्तींची वयाची १८ वर्षे पूर्ण होणार आहेत त्यांनी व विशेष करून महिला, दिव्यांग, उपेक्षित वाड्या वस्त्यावरील लोक, दुर्लक्षित लोक तसेच त्रुतियपंथीय यांनी विशेष मोहिमेच्या दिवशी आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे फॉर्म नंबर ६ भरून घेऊन आपली मतदान नोंदणी करून घ्यावी. तसेच ज्यांचे मतदार यादीतील नावात वा इतर दुरुस्ती असल्यास त्यांनी दुरुस्तीबाबत आवश्यक पुराव्यासह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे दुरुस्तीबाबत फॉर्म भरून द्यावा जेणेकरून मतदार यादी अचूक व परिपूर्ण होईल. तसेच राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर बुथलेवल एजंट्स नेमावेत व मतदार नोंदणी च्या या कार्यक्रमास सहकार्य करावे. असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले आहे. या कार्यक्रमावेळी शिवाजीराव लुगडे यांनी प्रस्ताविक करून सर्वांचे स्वागत केले. तर यावेळी पाटण नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. संगिता जाधव, प्राजक्ता भिसे, अंगणवाडी शिक्षिका सौ. गायकवाड यांच्यासह इंधरानगरमधील महिला नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.