भरतीसाठी गेलेल्या युवकांची क्रुझर नीरा उजव्या कालव्यात पलटी ; सात जण बचावले ; बेपत्ता युवकाचा शोध सुरु

फलटण : भरती प्रशिक्षण रद्द झाल्याने महाबळेश्वर येथे नातेवाईकांना भेटून माहूरला (नांदेड) येत असताना मध्यरात्रीच्या सुमारास मुलांची क्रुझर नीरा उजव्या कालव्यात पलटी झाली. अपघातग्रस्त गाडीमध्ये सात जण होते. त्यातील सहाजण पोहून बाहेर पडले मात्र एक जण वाहून गेला आहे.  कचरू दत्ता गिरेवाड रा.चितगिरी ता.भोकर जी .नांदेड (वय 24) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
नीरा उजवा कालवा खोल व रुंद असल्याने तसेच तो पुर्ण क्षमतेने वाहत असल्याने अपघातानंतर गाडी कालव्याच्या प्रवाहात पुर्णपणे पाण्यामध्ये बुडाली. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे गाडीचे दरवाजे उघडणे अशक्य झाले होते. यावेळी गाडीची पुढील व मागील काचा फोडून आपला जीव वाचवून काठावर येण्यात यावेळी गाडीतुन  सिद्धार्थ देवराव आरके (वय 22, रा. दत्तमांजरी, ता. माहूर, प्रफुल्ल दारासिंग राठोड (वय 23 रा. वझरा, ता.माहूर, शत्रुघ्न रामराव चांदेकर (वय 23, रा. वझरा ता.माहूर), मारुती संभाजी शेंबटेवाड (वय 23, रा. खराटवादी ता. हादगाव, कचरू दत्त गिरेवाड (वय 23, रा. चितगिरी ता.भोकर, बालाजी अनिल राठोड (वय 23 रा. दत्तमांजरी ता. माहूर), रामेश्वर शिवदास पवार रा. दत्तमांजरी ता. माहूर हे प्रवास करीत होते. परंतु त्यांचा सहकारी कचरू दत्ता गिरेवाड  वय 24, रा. चितगिरी, ता.भोकर जि.नांदेड हा दिसून आला नाही त्यामुळे तो गाडीत अडकला असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती.
दरम्यान, कालव्यातून अपघातग्रस्त गाडी बाहेर काढण्यात आली आहे. वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू आहे. चालकाला अंदाज न आल्याने नीरा उजवा कालव्यात क्रुझर गाडी नं.एमएच 26 एफ  2852 पलटी झाली. गाडीतील सातपैकी सहा जण पोहून बाहेर पडले. मात्र एक जण गाडीसह पाण्यात अडकला होता. मध्यरात्रीपासून पोलीस व पोलीस मित्र या एकाला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते.
आज सकाळी गाडी पाण्यातून बाहेर काढण्यात आली मात्र त्यात तरुण नव्हता. बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध पोलिस, पोलिस मित्र आणि ग्रामस्थांच्या मदतीने सुरु आहे.