सज्जनगड रस्त्यावरील पुलावरून वडाप कोसळली

परळी : सातारा- सज्जनगड रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणार्‍या वडाप गाडीचा रॉड तुटल्याने गाडी पुलावरून खाली कोसळली. ही घटना आज (रविवार) दुपारी 12.30 वाजता बोगदा परिसराच्या बाहेर असणार्‍या खंडोबाच्या खोरीत घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा- सज्जनगड रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी काळी-पिवळी वडाप जीप राजवाड्यावरून 10 प्रवासी घेऊन जात होती. बोगद्याच्या बाहेरील खंडोबाच्या खोरीतील वळणावर जीपचा रॉड तुटल्याने चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे जीप पुलावरून खाली कोसळली.
या जीपमधून प्रवास करणारे 7 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. जखमींना उपचारासाठी सातारा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.