मेढा घाटात दरड कोसळली तरी संबंधित विभागाची गांधारीची भुमिका

मेढा :- मेढा घाटात मेढा मालदेव दरम्यान पावसाच्या सतत रिपरिपीने दरड कोसळून भराव रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असला तरी संबंधित विभागाने चक्क गांधारीची भुमिका घेतल्याने जीवितहानी झाल्यावरच यांचे डोळे उघडणार का ? अशी चर्चा नागरीकांतून , दोन चाकी, चारचाकी वाहनधारकातून व्यकत होव. लागली आहे.
नुकताच काही महिन्यांपुर्वी आखाडेफाटा ते मेढा दरम्यान रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. निकृष्ठ कामामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून रस्ता वाहतुकीस अडचणीचा झाला आहे. मेढा ते आलेवाडी दरम्यान असणारा हा घाट रस्ता वाहनधारकांना कसरत करून पार करावा लागत असल्याने आणि दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यानंतर जागा नसल्याने ही वाहने अपघाताला निमंत्रण देतील अशी परिस्थीती निर्माण झाली आहे.
या रस्त्यावर वळणाचे ठिकाणी कोठेही संरक्षक कठडे नाहीत . मोर्‍यांची बांधकामे, रस्त्यावर पडलेले दगड, रस्त्यात पडलेले खड्डे, साईड पट्ट्यांची वाताहत याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष असून शासनानेरस्त्यांकरिता लक्षावधी रुपये खर्च केले मात्र दर्जेदार काम होत नसल्याने वाहनधारक, प्रवाशी वर्ग यांच्यामध्ये खात्याच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.