म्हसवडच्या बाजारपेठेत फिल्मी स्टाईल दरोडा

म्हसवड : म्हसवड शहरातील मुख्य बाजार पेठेच्या शिवाजी चौकात शुक्रवारी रात्री 8 वाजता तीन चोरट्यांनी पिस्तुलांनी गोळीबार करत माजी नगरसेवक पोपट मासाळ यांना धाक दाखवून 20 हजाराच्या रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा 6 लाख 32 हजाराचा ऐवज लांबवला. तद्दन फिल्मी स्टाईलने झालेल्या या दरोड्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मासाळ यांच्या सतर्कतेमुळे नागरिकांनी पाठलाग करुन एका चोरट्याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. ऐन दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर हा दरोडा शहरात झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबतची पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, म्हसवडच्या शिवाजी चौकात काळचौंडी, ता. माण येथील जगन्नाथ पांडुरंग माने (वय 52) यांचे काळभैरव ज्वेलर्सचे दुकान आहे. दसरा – दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी व्यवसायासाठी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केले होते. शुक्रवारी सायंकाळी 8 च्या दरम्यान जगन्नाथ माने त्यांची पत्नी संगीता व माजी नगरसेवक पोपट मासाळ हे दुकानात होते. त्यावेळी 25 ते 30 वयोगटातला मजबूत देहयष्टीचा एक युवक दुकानात आला. आल्या आल्या त्याने सदाशिव कोण आहे असे त्याने विचारणा केली. दुकानदार माने म्हणाले, इथे या नावाचे कोणीच नाही. मात्र त्यांनी माझ्या बहिणीची छेड तूच काढलीस अशी हुज्जत घालत भांडणाला सुरुवात केली. त्यावेळी अज्ञात दोघांनी मागून येवून दुकानाचे शटर आतून बंद केले व त्यांनी बंदूक आणि सतूरच्या धाकाने पोपट मासाळ यांच्या कानाला पिस्तूल लावून दमदाटी करु लागले. दोन गोळ्या भिंतीवर झाडून दहशत निर्माण केली. चोरट्यांनी माने यांच्या दुकानातील 2 लाख 10 हजार रुपयांची 10 तोळे सोन्याची लगड, 20 हजार रुपयांचा एक तोळ्याचा सोन्याचा गंठण, 20 हजार रुपयाच्या अर्ध्या तोळ्याच्या दोन बोरमाळा, 20 हजार रुपयाचा 1 तोळ्याच एक नेकलेस, 12 हजार रुपयाच्या 6 ग्रॅम वजनाच्या 6 जोड (सोन्याची डोरली), रिंगा, कानातील झुबे व फुले व इतर दागिन्यांसह रोख 20 हजार असा 6 लाख 32 हजाराचा ऐवज लुटला.

 

पोपट मासाळ यांच्याकडील 11 हजार रुपये काढून घेतले. मासाळ यांनी गयावया करताच चोरट्यांनी त्यांना 500 रुपये देवून तेथून पोबारा केला. चोरटे पळून जाण्याच्या दरम्यानच मासाळ यांनी रस्त्यावर येवून चोर, चोर असा मोठ्याने आरडाओरडा केला. तेव्हा दोघे जण दुचाकीवरुन पळून जाण्यात यशस्वी झाले. तर तिसरा चोरटा काही तरुणांच्या हातात सापडला. एकाने त्याला वीट फेकून मारली. सदर चोरटा तलाठी कार्यालयाशेजारील एका बोळात सापडला. तेथील बागेत लपून बसला असता जमावाने त्याला शोधून बेदम चोप दिला. व म्हसवड पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक शाहुराज कदम यांच्या हवाली केले. गणेश तुकाराम मोरे (रा. चिक महुद, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे चोरट्याचे नाव असून अन्य दोघेही माळशिरस तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तयार केली असून तपासाला रवाना केली आहेत.