केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदत करण्याच्या उद्देशाने सातारा शहरामधून मदत फेरीचे आयोजन

साताराः येथील सातारा येथीलसर्व रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लब सातारा कँम्प , इनरव्हील क्लब सातारा, रोटरॅक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदत करण्याच्या उद्देशाने सातारा शहरामधून मदत फेरीचे आयोजन करण्यात आले .
केरळ मध्ये महापुराने थैमान घातले असून देवभूमीत आलेल्या संकटाबद्दल आपणास कल्पना आहेच. गेले 8-10 दिवसांपासून  शेकडो लोकांनी आपले प्राण गमावलेले असून लाखो लोक  बेघर झाले आहेत. पुराचे पाणी घरांच्या दोन मजल्यांपर्यंत शिरले असून संपूर्ण केरळ राज्य हे पूराच्या पाण्याने वेढलेले असून अशा या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी केरळमधील आपल्या बांधवांना आपल्या मदतीची आवश्यकता आहे. संपूर्ण जगभरामधून मदतीचा ओघ सुरू झाला असून त्यामध्ये सातारा कसा मागे राहील!
सातारा येथील इनरव्हील क्लब सातारा कँम्प, सर्व रोटरी क्लब, इनरव्हील क्लब सातारा आणि रोटरक्ट क्लब या सर्व क्लबचे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थीत होते. रविवार, दि. 26 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10 वाजता सातारा शहरातून या मदत फेरीचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सातारा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक   पंकज देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रगीताचे  सामुहीक गायन करुन केली. श्री. देशमुख म्हणाले मदत करण्यासाठी महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर असतो. इनरव्हिल क्लब सातारा कॅम्प व रोटरी क्लब सातारा यांचे त्यांनी कौतुक केले व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
तालीम संघ मैदान, कमानी हौदामार्गे, राजपथावरुन मोती चौक, राजवाडामार्गे पुन्हा खालच्या रस्त्याने शेटे चौक, पोलिस मुख्यालयामार्गे, पोवई नाकामार्गे मदत फेरी आयोजित करण्यात आली.
या फेरीमध्ये वस्तू, कपडे व औषधे तसेच आर्थिक स्वरुपात मदत स्वीकारली. सर्व व्यापारी वर्ग, सातारा शहरातील सुजाण नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी या फेरीसाठी भरीव आर्थिक मदत केली. आर्थिक मदत देणार्‍या व्यक्तींना  80 प्रमाणपत्र देण्यात येईल. मदतफेरीसाठी  रो. प्रभुणे, रोटरी क्लब अजिंक्यचे अध्यक्ष  अभय ढवळीकर, इनरव्हिल क्लब सातारा कॅम्पच्या अध्यक्षा सौ. निना महाजन,  सौ. गीता मामनिया,  सौ. कलानी, सौ. वंदना देसाई ,रो. प्रद्युम्न आगटे,   डॉ. शंकर गोसावी,  रो. राजन मामनिया,  रो. खजुरे, रो. अंबरदार, वगैरे मान्यवर उपस्थित होते.