रिपाइं नेते शरद गायकवाड यांचे निधन

*सातारा .* रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडियाचे सातारा जिल्हा कामगार युनियनचे अध्यक्ष शरद गायकवाड (वय वर्षे ४३) यांचे सोमवारी रात्री पुणे येथे अल्पशा अजाराने निधन झाले. माहुली येथील कृष्णा वेण्णा या नद्यांच्या संगमावर असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत काल त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंकार करण्यात आले. शरद गायकवाड यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनाने रिपब्लिकन चळवळीसह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

वयाच्या २० व्या वर्षापासून शरद गायकवाड चळवळीत सक्रिय कार्यरत होते. अन्याय अत्याचाराविरोधात मोर्चे, आंदोलनांतून ते आपला आक्रमक सहभाग नोंदवत असत. त्यांच्या या आक्रमक वृत्तीची दखल घेत बहुजन समाज पक्षाने त्यांना स्वतःच्या पक्षात सामील करून घेतले. यथावकाश त्यांनी राजगृह संस्था स्थापन करून त्यामाध्यमातून विविध उपक्रमही राबवले. शहर आणि परिसरात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केली. कालांतराने रामदास आठवले यांचे नेतृत्व त्यांनी मान्य केले आणि रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडियाचे जिल्ह्याचे नेते अशोकराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. इथे अनेक पदावर काम करून त्यांनी पक्षाला बळकटी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. काही वर्षापासून त्यांच्यावर जिल्हा कामगार युनियनची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

अत्यंत हसमूख आणि दिलदार वृत्तीचे शरद गायकवाड याचे व्यक्तिमत्त्व होते. पक्षात त्यांच्या या वृत्तीचे सदैव कौतुक होत असत. अनेक पत्रकारांच्या मनात त्यांच्याबाबत आदर होता. तळागाळातल्या उपेक्षित कामगारांसाठी झटणारा सच्चा नेता म्हणून गायकवाड यांची ओळख होती. साता-याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अलिकडच्या काही वर्षात त्यांना स्थानिक राजकारणात येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार त्यांनी आमदारांच्या हाकेला ओ दिली आणि यथावकाश नगरपालिका निवडणुकीत आपल्या कार्यकर्तृवाची मोहरही उमटवली.

शरद गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त समजतात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचीव तथा महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्यायमंत्री अविनाश महातेकर यांनी दुःख व्यक्त केले. जेष्ठ साहित्यिक पार्थ पोळके, अशोक गायकवाड, लेखक अरुण जावळे, बाळासाहेब शिरसट, चंद्रकांत खंडाईत, दादासाहेब ओव्हाळ, अमोल आवळे, सुशीलकुमार कांबळे, ॲड. दयानंद माने प्रविण धस्के, गणेश कारंडे, संदीप कांबळे, नरेंद्र वाघंबरे, क्रांती थिएटरचे अमर गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी अंत्यसंस्काराच्या ठिकाणी उपस्थित राहून गायकवाड यांना श्रध्दांजली अर्पण केली.