रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्यावतीने पू.श्रीगुरुजी पुरस्कार 2018 जाहीर ; चेवांग नॉर्फेल यांना पर्यावरण तर ज्योती पठानिया यांना महिला सबलीकरनाचा पुरस्कार जाहीर


सातारा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) च्या वतीने दिला जाणारा परमपूजनीय श्रीगुरूजी पुरस्कार -2018 यावर्षी पर्यावरण क्षेत्रासाठी  चेवांग नॉर्फेल, लडाख, काश्मिर यांना तर महिला सबलीकरण क्षेत्रासाठी श्रीमती ज्योती पठानिया, चैतन्य महिला मंडळ, मोशी, पुणे यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा रा. स्व. संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) चे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सातारा जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात रविवार दि. 11 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी 5.30 वाजता हा पुरस्कार प्रदान सोहळा होत असून या समारोहाचे प्रमुख वक्त्ते  सुरेशजी सोनी, सहसरकार्यवाह रा. स्व. संघ, दिल्ली हे आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक स्वर्गीय, श्रद्धेय माधव सदाशिव गोळवलकर तथा परम पूजनीय श्रीगुरूजी यांचे स्मरणार्थ रा. स्व. संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) 1996 सालापासून प्रतिवर्षी राष्ट्रजीवनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्त्ती अथवा संस्थांना परमपूजनीय श्रीगुरूजी पुरस्कार देऊन सन्मानित करते. पुरस्काराचे यंदाचे हे 23 वे वर्ष असून 22 वर्षात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या 62 व्यक्त्ती , संस्थांना परम पूजनीय श्रीगुरूजी पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये अगदी नावाजलेल्या  दिग्गज व्यक्त्ती व संस्थांबरोबर जोमाने नेटाने त्या त्या क्षेत्रात काम करीत पुढे येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या व्यक्त्ती , संस्थांचाही समावेश आहे. या विविध 10 क्षेत्रांची पाच गटात विभागणी केली असून प्रत्येक गटात 2 विषय आहेत. हे गट खालीलप्रमाणे-  गट क्रमांक 1 – वाङ्मय – सेवा  गट क्रमांक 2 – क्रीडा – कृषी  गट क्रमांक 3 – कला – समाजप्रबोधन  गट क्रमांक 4 – अनुसंधान – धर्मसंस्कृती  गट क्रमांक 5 – पर्यावरण – महिला सबलीकरण . दरवर्षी एका गटातील 2 पुरस्कारांचे वितरण याप्रमाणे 5 वर्षात 1 चक्र पूर्ण होते. परमपूजनीय श्रीगुरूजी पुरस्काराचे स्वरुप-शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ -सन्मानपत्र- सन्मानचिन्ह व रुपये 1,00,000 /- (रुपये एक लाख फक्त्त)) असे आहे.
श्री. नॉर्फेल, हे लेह न्यूट्रीशन प्रोजेक्ट या मध्ये मुख्य प्रकल्प अधिकारी म्हणून काम करतात. या संस्थेने भारतीय सेने सोबतही ऑपरेशन सद्भावना अंतर्गत हे काम केले आहे. त्यांच्या या क्रांतीकारी तंत्रामुळे श्री. चेवांग नॉर्फेल यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
श्रीमती ज्योती पठानीया यांनी 1992 पासून समाजकार्यास प्रारंभ केला .चैतन्य महिला मंडळाची स्थापना करुन विस्थापित व पीडित महिला व मुलांच्या पुनर्वसनाचे कार्यात वाहून घेतले.मानवी वाहतुकीला व बाजारु लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रिया तसेच छेडछाड, अन्याय झालेल्या महिलांसाठी कार्य करण्यासाठी आवश्यक ती सरकारी मान्यता मिळवली. विभिन्न योजनांच्या अंतर्गत महिलांचे सबलीकरण करुन त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न श्रीमती पठानिया यांनी केला.

पत्रकार परिषदेत रा. स्व. संघ जनकल्याण समिती सातारा जिल्ह्याचे कार्यवाहक शरद भरमगुंडे, जिल्हाध्यक्ष मधूसुदन फणसळकर, प्रांत सहकार्यवाह अरुण डंबे, विनय थत्ते, डॉ सुभाष दर्भे, सारंग कोल्हापूरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.