“Run For Vote” सातारा येथे स्वीप अंतर्गत भव्य रॅली

सातारा (जिमाका) 18- सातारा लोकसभा मतदार संघ आणि सर्व विधानसभा मतदार संघातील मतदारांना मतदानाचे महत्व कळावे म्हणून दि. 18 ऑक्टोंबर 2019 रोजी मतदार जागृती अभियान (स्वीप) अंतर्गत सातारामध्ये सकाळी ८.३० वाजता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
“Run For Vote” रॅलीच्या उदघाटन प्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी मतदानाचे महत्व विषद करुन १८ वर्ष वयोगटाच्यावरील सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहीजे असे संबोधले. तर प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी स्वीप अंर्तगत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच आयोजित केलेल्या मतदार जागृती रॅलीचे महत्व विषद करून शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले…
सदरची रॅली तालीम संघ मैदान, कमानी हौद, शेटे चौक, पोलीस मुख्यालयाजवळून परत तालीम संघ मैदान अशी सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग, सातारा जिल्हा क्रीडा विभाग आणि शासनाच्या सर्व विभागांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने सातारा शहरातून काढण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला सुशीलादेवी विद्यालयाच्या मुलींनी निवडणुकीतील मतदानाचे महत्व विषद करणारी पथनाटीका सादर केली.. या उपक्रमात सातारा शहरातील सतरा माध्यमिक विद्यालये आणि पाच उच्चमाध्यमिक विद्यालयांनी सहभाग नोंदविला होता…जवळ जवळ तीन हजार विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होत्या.. या रॅलीमध्ये मतदान करा मतदान करा… भारतीय लोकशाही समृद्ध करा.., मतदान है जरूरी… ना समजो मजबूरी ..!, छोडो अपने सारे काम.. पहले चलो करे मतदान.., अपना अमूल्य वोट देकर… अपना भाग्य स्वयं लिखे, वोट डालने जाना है.. देश के प्रति फर्ज निभाना है, एक वोट जे जीत हार… वोट न हो कोई बेकार, मतदान हेच सर्वश्रेष्ठ दान …! अशी घोषवाक्ये लिहलेले फलक लक्ष वेधून घेत होते.
या रॅलीत प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला, नगरपालीकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकरराव गोरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी संचित धुमाळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, सहाय्यक निबंधक प्रीती काळे, तालुका क्रीडाधिकारी बळवंत बाबर, सुनील कोळी तसेच सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष यशवंत गायकवाड, सचिव राजेंद्र माने आर.एस.पी.संघटनेचे नामदेव जगदाळे, सातारा शहरातील आर.एस.पी.शिक्षक अधिकारी आणि शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक विविध विद्यालयातून आलेले इतर शिक्षक मुख्याध्यापक आणि पालकवर्ग तसेच सातारा शहारातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते…
रॅलीच्या समारोप प्रसंगी सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी पहिले मतदान करावे आणि नंतरच इतर कामे करावीत असे आवाहन साता-याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले…त्या बरोबरच त्यांनी मतदारांना काही अडचणी निर्माण झाल्यास शासनाच्या टोलफ्री नंबर संपर्क साधावा असेही आवाहन केले.