सलाम… त्या जिद्दी आरोग्यसेवक स्वच्छता कर्मचाऱ्यांना…

सातारा :- पहाटे गार वाऱ्यात अद्याप सातारकरांची पुरती झोपही झाली नसताना शहरातील यादोगोपाळ पेठेतील बोकील हॉस्पिटल नजीकच्या बोळामध्ये कुदळ ,फावडी ,टिकाव आणि माणसांचा काम करत असल्याचा गलका ऐकू आला.
 सकाळी साडे सहा वाजताच सातारा पालिकेची आरोग्य विभागाची टीम याठिकाणी पोहोचली होती. कारणही तसेच होते .गेले चार दिवस मागील आठवड्यात झालेल्या पावसाने या परिसरातील गटर वाहून आलेल्या वाळू आणि मातीने पूर्णपणे चोकप होऊन रस्त्यातून गेले दोन दिवस पाणी वाहत होते .
काल बुधवारी सकाळी या कर्मचाऱ्यांनी हे गटार उघडले. मात्र काम पूर्ण न झाल्याने ते काल सायंकाळी येथून निघून गेले. मात्र आज  गुरुवारची पहाट होताच या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिद्दीने सुमारे दोन तासाचे परिश्रम आणि अपार कष्ट घेत हे काम पूर्ण केले .तसे पाहता रस्त्यातून वाहणारे सांडपाणी  आणि तुंबलेले नाले आपल्याला बऱ्याच वेळा अनेक दिवस पाहायला मिळत असतात .
मात्र सध्याच्या  कोरोना च्या  युद्धजन्य  आणि  अशा  परिस्थितीतही अगदी कोरोना च्या आजाराची भीती आणि संकट डोक्यावर असताना हे पाच जण पहाटे सहा वाजता उठून या कामाला  लागले.  गटारीत अडकलेली वाळू  ,प्लास्टिक पिशव्या  , कचरा हे तारेने ओढत केलेली सफाई आणि त्यानंतर महाकाय सिमेंट ब्लॉक याठिकाणी बसवून त्यानंतर त्यांनी कामाच्या सुटकेचा निश्वास सोडला.हे काम सुरू असताना परिसरातील अनेक नागरिक अक्षरशा डोळे चोळत काय गडबड चालली आहे हे पाहून जात होते. मात्र दोन तास राबलेल्या  हातांना साधा माणुसकीचा पाठिंबा मिळाला ना एखाद्या घरातून चहाचा कप मिळाला .
संपूर्ण टाळेबंदी मुळे हे आरोग्य सेवक मात्र काम झाल्यावर अगदी आनंदाने याठिकाणी सर्व व्यवस्थित झाल्याचे पाहून पुढील कामासाठी रवाना झाले .  खऱ्या अर्थाने सातारा नगरपालिकेने या परिस्थितीत रस्त्यातुन वाहणारे सांडपाणी आणि तुंबलेली गटारे साफ करण्यासाठी आपल्या विभागाला दिलेले कानमंत्र आणि या आरोग्य सेवकांनी अक्षरशः तातडीने काम पूर्ण करून दाखवलेला उत्साह हा खरोखरच शाब्बासकी देणाराच वाटतो.